माझे बोट धरल्यावर मी असले काम करू देणार नाही; शरद पवार यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

माझे बोट धरल्यावर मी असले काम करू देणार नाही; शरद पवार यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

निवडून दिल्यानंतर मी जे मत ज्या नावाने, ज्या पक्षाने, ज्या कार्यक्रमाने तुमच्याकडे मागितले, ते नाव, पक्ष, सगळे तुम्ही विसरलात. मग तुम्ही लोकांची फसवणूक करता. ही फसवणूक होता कामा नये. राजकारणामध्ये लोकांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. लोकांचे भवितव्य हे पाळले पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला. बारामती येथील एका मेळाव्यात ते बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.

नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. बारामतीला आले होते, तिथे भाषण केले, तेव्हा म्हणाले होते की, शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो. मात्र, पण आज त्यांचे जे काही राजकारण सुरू आहे. ते माझ्या विचारांनी नाही. माझे बोट धरल्यावर मी असले काम करू देणार नाही. मोदी सरकारने आखलेली धोरणे हिताची नाहीत. पंतप्रधान काय म्हणतात? पंतप्रधान कर बसवतात, वसूल करतात. त्या वसुलीतून 100 रुपये आले तर त्यातले 6 रुपये खिशात टाकतात आणि सांगतात की, तुमच्या खिशात मी पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. ही गॅरंटी कशी? वसूल करायचे 100 आणि 6 परत द्यायचे. 100 वसूल करायची गॅरंटी हे आजचे पंतप्रधान म्हणतात. ही सामान्य माणसाच्या दृष्टीने योग्य गोष्ट नाही. हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही. जिथे हित नाही, तिथे बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी ईडी कारवाईवरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला. आज सत्ता ही हुकूमशाहीच्या रस्त्याला आपण जातो, त्या पद्धतीने वापरली जाते. तुम्हाला झारखंड नावाचे राज्य माहिती आहे का? आदिवासींचे राज्य आहे. मोदींविरुद्ध भूमिका घेतली. तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे. केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरूण मुख्यमंत्री झाला. त्यांची शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातून व बाहेरून लोक यायला लागले. चांगले राजकारणी आज तुरुंगात आहेत. कशासाठी, असे सवाल करत शरद पवार यांनी टीका केली.

निवडणूकीत बटण दाबले पाहिजे. आता यावेळेची खूण ही वेगळी आहे. घड्याळ्याची खूण ही तुम्हाला पाठ होती. पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याचीच चोरी झाली. बाकी किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. सगळेच्या सगळे सोडून गेले. आता सगळ्या देशाला माहीत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला? हा पक्ष आपण स्थापन केला. जे घेऊन गेले, त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मते मागितली. ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने. झेंडा कोणता होता? तोच घड्याळाचा होता. त्यामुळे हे सगळे घेऊन मंडळी गेली. त्यामुळे काही लोक नाराज झाले. मी म्हटले नाराज व्हायचे नाही. गेले ते गेले! आपण नवीन उभे करू. हा अधिकार लोकांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. नवीन पक्ष काढू. काही नसताना पक्ष काढला, तर पक्ष नुसता काढला नाही तर राज्य हातामध्ये घेतले. अनेकांना मंत्री केले, अनेकांना आमदार केले, अनेकांना खासदार केले, अनेकांना केंद्राच्या मंत्रीमंडळात घेतले. नवनवीन धोरणे घेतली, असे शरद पवारांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;