बारामतीत मेफेंटरमाइनच्या तब्बल 90 बाटल्या जप्त
तरुणांमध्ये जिमची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून, अनेकजण हे झटपट शरीरयष्टी तयार करण्याच्या नादात स्टेरॉइडससह अन्य सप्लिमेंट्सच्या आहारी जात आहेत. शहरासह ग्रामीण भागातदेखील तरुणांना आरोग्यासाठी घातक असणाऱ्या अशा स्टेरॉइड्सची खुलेआम विक्री केली जात असल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत.
बारामती शहरात जिममध्ये व्यायामाची क्षमता वाढविण्यासाठी काही तरुण आणि काही महिला आणि हृदय रोग असलेल्या रुग्णांना दिले जाणारे मेफेंटरमाइन दिले जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मेफेंटरमाइनच्या तब्बल ९० बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, एकाला अटक केली आहे. तर, एकावर गुन्हा दाखल केला आहे. गतवर्षी अशाचप्रकारे पुण्यात बेकायदा स्टेरॉइड इंजक्शनची विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यांच्याकडून १४ इंजेक्शन जप्त करण्यात आली होती.
प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय स्टेरॉइड्स किंवा सप्लिमेंटचे सेवन केल्यामुळे काही तरुणांना मूत्रपिंडाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, काहीजणांचे तर मूत्रपिंड कायमस्वरूपी निकामी होत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करू नये, असे आवाहन जिम प्रशिक्षक, आहारतज्ज्ञांनी केले आहे.
गेल्या काही वर्षांत बॉडीबिल्डिंग करणाऱ्या तरुणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातदेखील जिममध्ये दररोज जाऊन व्यायाम करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे आपलीही शरीरयष्टी असवी, असा प्रत्येक तरुणाचा अट्टाहास असतो. मात्र, नैसर्गिक पदार्थांचे सेवन करून झटकन शरीरयष्टी बनत नाही, त्यामुळे अनेक तरुण हे सल्ला न घेताच, थेट स्टेरॉइडसह अन्य सप्लिमेंट्सच्या आहारी जाऊ लागले आहेत. मात्र, अशा सप्लिमेंट्सच्या घातक परिणामांना सामोरे जावे लागत आहे. स्टेरॉइड, हाय प्रोटीन डाएट, क्रिएटीनचा अतिरिक्त वापर शरीरासाठी घातक असल्याचे जागतिक स्तरावरील अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
स्टेरॉइडमुळे हार्मोन्समध्ये बदल होण्याचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. तसेच त्वचेसंदर्भातील विकार उद्भवण्याची शक्यता असते. हाडांच्यादेखील समस्या उद्भवू शकतात. तसेच, बाजारात अनेक बनावट स्टेरॉइड उपलब्ध आहेत. त्याचादेखील विपरित परिणाम हा तरुणांच्या आरोग्यावर होत आहे. स्टेरॉइड घेताना योग्य सल्ला घ्यावा, डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच शक्यतो नैसर्गिक आहारावर भर द्यावा.
-ललित शिवले (संचालक, रॉयल हेल्थ क्लब)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List