Mumbra Train Accident – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, शरद पवार यांची मागणी
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी घडली. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व प्रवशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
शदर पवार यांनी एक्सवर पोस्ट करत दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भात आपल्या भावना व्यक्त करत प्रवाशांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. ते म्हणाले की, “मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मध्य रेल्वेवर दररोज सरासरी 6 ते 7 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही,” असे शरद पवार म्हणाले आहेत.
अपघाताची जबाबदारी रेल्वे टाळू शकत नाही; अजित पवार यांचे स्पष्ट मत
“केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे,” अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List