दहशतवादी मसूद अझहरच्या कुरापती, कश्मीरनंतर आता म्यानमारमध्ये उभारतोय जिहादी नेटवर्क
पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आता कश्मीरमध्येच नव्हे तर म्यानमारमध्येही आपले नेटवर्क तयार करत आहे. गुप्तचर अहवालानुसार, मसूद अझहरच्या नेतृत्वाखाली ही संघटना आता रोहिंग्या मुस्लिमांना कट्टरपंथी बनवत आहे. तसेच म्यानमारमध्ये जिहादी नेटवर्क तयार करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदने म्यानमारच्या एका तरुणाला पाकिस्तानच्या बालाकोट प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षणानंतर हा तरुण म्यानमारला परतला असून आता तो जिहादी कमांडरच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. जैश-ए-मोहम्मदने शस्त्रास्त्रे आणि दहशतवादी कारवायांसाठी म्यानमारला सुमारे 42 लाख रुपये दिल्याचेही अहवालात म्हटले आहे.
म्यानमारमधील रखाईन राज्यात आधीच अशांतता असल्याने तेथे कट्टरपंथीयांसाठी पोषक वातावरण आहे. याचाच फायदा घेत जैश-ए-मोहम्मद रोहिंग्या समाजातील बेरोजगार आणि संतप्त तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. रोहिंग्यांचा वापर करत जैश हिंदुस्थानातील निर्वासितांद्वारे कश्मीर किंवा इतर भागात हल्ला करण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. हजारो रोहिंग्या निर्वासित जम्मू-कश्मीर, दिल्ली आणि हैदराबादमध्ये राहत आहेत.
जैशचे म्यानमारमधील नेटवर्क हिंदुस्थानसाठी विशेषतः ईशान्येकडील राज्यांसाठी धोका बनू शकते. जैशने म्यानमारमध्ये तळ स्थापन केला तर तिथून दहशतवाद्यांना आणि शस्त्रास्त्रांना हिंदुस्थानात घुसखोरी करणे सोपे होईल. मात्र याचा हिंदुस्थान आणि म्यानमार संबंधावर परिणाम होऊ शकतो.
माध्यमांच्या वृत्तानुसार, भारत म्यानमारशी आपले धोरणात्मक संबंध मजबूत करत आहे. भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग असो किंवा कलादान प्रकल्प असो, भारताचे ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’ म्यानमारच्या स्थिरतेवर अवलंबून आहे. परंतु जर म्यानमारमधून हिंदुस्थानविरुद्ध दहशतवादी कट रचले गेले तर दोन्ही देशांमधील संबंध बिघडू शकतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List