पगारावरून वाद झाला अन् चाकूनं भोसकलं; ‘रहस्य’ फेम चित्रपट निर्मात्याचा ड्रायव्हरवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
प्रसिद्ध चित्रपट निर्माते मनीष गुप्ता यांनी आपल्या ड्रायव्हरवर चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसातील सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. पगारावरून दोघांमध्ये वाद झाला आणि यातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अर्थात गुन्हा दाखल झाला असली तरी अद्याप गुप्ता यांना अटक करण्यात आलेली नाही. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
वर्सोवा पोलीस स्थानकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना गुरुवारी रात्री घडली. सागर संजोग इमारतीत राहणाऱ्या मनीष गुप्ता यांनी त्यांच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून ड्रायव्हरचे काम करणाऱ्या राजीबुल लश्कर याच्यावर चाकून हल्ला केला. दोघांमध्ये पगारावरून बाचाबाची झाली होती. या प्रकरणी मनीष गुप्ता यांच्यावर भादवि कलम 118 (2), 115 (2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या ड्रायव्हरने एफआयआरमध्ये सर्व घटनाक्रम सांगितला. मी मनीष गुप्ता यांच्याकडे गेल्या तीन वर्षापासून काम करत आहे. मनीष गुप्ता यांच्याकडून मला महिना 23 हजार रुपये पगार मिळतो. मात्र त्यांनी कधीही वेळेवर पगार दिला नाही. एवढेच नाही तर 30 मे रोजी अचानक नोकरीवरून काढून टाकले, असे पीडित ड्रायव्हरने सांगितले.
नोकरीवरून काढून टाकल्यानंतर गुप्ता यांनी कामाचे उर्वरित पैसे दिले नाहीत. आपल्या हक्काचे पैसे मागण्यासाठी त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी पैसे तर दिलेच नाहीत उलट वाद सुरू केला. हा वाद एवढा विकोपाला पोहोचला की त्यांनी किचनमधील चाकूने लश्करवर हल्ला केला. यात ड्रायव्हर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोण आहेत मनीष गुप्ता?
मनीष गुप्ता हे स्क्रीन रॉयटर, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. काही काळापूर्वी त्यांनी अभिनेत्री रवीना टंडन सोबत ‘वन फ्रायडे नाईट’ नावाचा क्राईम-थ्रिलर चित्रपट बनवला होता. 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List