कल्याण एपीएमसीच्या ‘कृषी मॉल’चा भूखंड खासगी व्यापारी संस्थेच्या घशात, निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घपला

कल्याण एपीएमसीच्या ‘कृषी मॉल’चा भूखंड खासगी व्यापारी संस्थेच्या घशात, निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घपला

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच प्रशासकांच्या कारनाम्याचा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बळीराजाचे हित जपण्यासाठी बाजार समितीने प्रस्तावित ‘कृषी मॉल’साठी राखीव ठेवलेला भूखंड प्रशासकांनी चक्क एका खासगी व्यापारी संस्थेच्या घशात घातला आहे. प्रास्ताविक मेट्रो स्टेशनला लागून असलेल्या सर्वोदय मॉलसमोरील हा मोक्याचा भूखंड 10 वर्षांच्या करारावर दिला आहे. केडीएमसीच्या सुविधा भूखंडाचे आरक्षण डावलून झालेल्या या व्यवहारात मोठा घपला पाडल्याची चर्चा आहे.

कल्याण बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाळ मार्च 2024 मध्ये संपल्यानंतर दोनदा मुदतवाढ दिली. वाढीव मुदतीचा कालावधी 21 एप्रिल 2025 रोजी संपुष्टात आल्यावर जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांनी प्रशासक म्हणून बाजार समितीची सूत्रे हाती घेतली. दरम्यान 21 मे रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांच्या आदेशाने बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध झाला.

मात्र तत्पूर्वीच प्रशासक किशोर मांडे यांनी बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवलेला मोक्याचा भूखंड एका खासगी व्यापारी संघटनेला भाडे करारावर देण्याचा निर्णय घेतला. व्यापारी संस्थेला भाडे तत्त्वावर भूखंड देण्यापूर्वी प्रशासकांनी कोणतीही जाहिरात काढलेली नाही तसेच लिलावदेखील करण्यात आलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे या ठरावाला पणन संचालक विकास रसाळ यांची मंजुरी घेऊन बांधकाम मंजुरीसाठी हा ठराव कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे पाठवला आहे.

मूळ धोरणाला हरताळ

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘कृषी मॉल’ उभारण्याचा निर्णय यापूर्वीच बाजार समितीने घेतला आहे. मात्र या धोरणाला प्रशासकांनी हरताळ फासला आहे. त्यामुळे शेतकरी हिताचा विचार करून खासगी व्यापारी संस्थेला ही जागा वापरण्यास अथवा त्यावर बांधकाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये अशी मागणी काही शेतकरी संघटना, सेवा संस्थांचे प्रतिनिधी आणि माजी संचालकांनी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.

कोट्यवधींचा गैरव्यवहार

केडीएमसीने सुविधा भूखंडाचे आरक्षण प्रस्तावित कृषी मॉलच्या जागेवर टाकले आहे. यावरून पालिका आणि बाजार समितीमध्ये वाद आहे. असे असताना प्रशासकांनी हा भूखंडच खासगी व्यापारी संस्थेला देण्याचा ठराव केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. साडेचार एकर जागेसाठी 25 लाख डिपॉझिट आणि महिना अवघे अडीच लाख भाडे असा 10 वर्षांचा करार असून या व्यवहारात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. बाजार समितीची निवडणूक सुरू असताना आचारसंहिता भंग झाल्याची तक्रारही शासनाकडे करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;