एमपीएलमधील ‘सीएसके’ ने खेळाडूंचे पैसे बुडविले! महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून अद्याप कुठलीच कारवाई नाही
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) सुरू केली. आता खेळाडूंना पैसे मिळतील. खेळण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळणार आणि महाराष्ट्र क्रिकेट संघ रणजी जिंकण्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरविणार, अशी स्वप्ने ‘एमसीए’चे नवे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी त्यावेळी दाखविली होती. मात्र, रणजी करंडकात महाराष्ट्राचा संघ रसातळाला राहिला. याचबरोबर मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या छत्रपती संभाजी किंग्ज (सीएसके) संघाच्या मालकांनी चक्क खेळाडूंचे पैसे बुडवून अखिलाडूपणाचे दर्शन घडविले. यंदाच्या ‘एमपीएल’मधून या संघाचा पत्ता कट झाला असला, तरी एमसीएने पैसे बुडविणाऱ्या या संघाच्या फ्रेंचाईजी मालकांवर कुठलीच कारवाई केलेली नाहीये.
एमपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सहा विभागांतील सहा संघांची निवड करण्यात आली होती. यात छत्रपती संभाजी किंग्ज संघाने मराठवाड्याचे प्रतिनिधित्व केले होते. मराठवाड्याच्या राजकारणातील बडे नेते असलेल्या धनंजय मुंडे यांनी एमपीएलच्या माध्यमातून क्रिकेटमध्येही पदार्पण केले. ‘सीएसके’ या संघाची फ्रेंचाईजी आमदार धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली होती.
छत्रपती संभाजी किंग्ज संघाच्या व्यवस्थापनामध्ये राज घनवट, विजय मुंडे, नितीन देशमुख, अभिषेक सावलीकर, दर्शन गुजराथी, संतोष माने, व्यंकटेश मुंडे, श्रीनिवास खैरे, प्रमोद दुबे, रोहित देशमुख, मिहीर मुळे आदी नावांचा समावेश होता. या संघात निवडलेल्या 22 खेळाडूंपैकी 11 खेळाडू हे मराठवाड्यातील होते. एमपीएल स्पर्धेच्या माध्यमातून मराठवाड्यासह ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना आम्ही संधी दिली आहे. या महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा मूळ उद्देश ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आहे. त्यामुळे मी स्वतः मराठवाड्यातील टीमची जबाबदारी घेतली आहे, अशा फुशारक्या त्यावेळी धनंजय मुंडे यांनी मारल्या होत्या. मात्र, दोन वर्षे खेळलेल्या ‘सीएसके’ संघातील खेळाडूंना त्यांचे मानधन आजपर्यंत मिळू शकले नाही. एमसीएकडूनही या संघावर कुठलीच कारवाई झालेली नाही, हे विशेष.
खेळाडूंचे 1 कोटी, तर एमसीएचे 3 कोटी थकीत
छत्रपत्री संभाजी किंग्ज अर्थात ‘सीएसके’ संघात 22 क्रिकेटपटूंचा समावेश होता. राजवर्धन हंगर्गेकर या संघाचा आयकॉन खेळाडू होता. या सर्व खेळाडूंना दोन वर्षांचे मानधन न मिळणे, ही गंभीर बाब होय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून आतापर्यंत या संघावर कारवाई होणे अपेक्षित होते; पण दुर्दैवाने तसे घडले नाही. सीएसके संघातील खेळाडूंना अद्याप त्यांचे मानधन मिळालेले नाहीये. शिवाय एमसीएचेही या फ्रेंचाईजींकडे देणे आहे. हे पैसे मिळाले नाहीत, तर आम्ही ‘सीएसके’ संघावर कारवाई करणार आहोत, अशी माहिती अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली. खेळाडूंचे एक कोटी आणि एमसीएचे तीन कोटी रुपये ‘सीएसके’ संघाकडे थकीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List