रखडलेली नालेसफाई तातडीने पूर्ण करा! शिवसेनेची एफ-दक्षिण कार्यालयाच्या बैठकीत मागणी
मुंबईच्या नालेसफाईला मुदतवाढ दिल्यानंतरही नालेसफाई रखडली आहे. त्यामुळे परळ, लालबाग, शिवडी, भोईवाडा, काळाचौकी, करी रोड, चिंचपोकळी या एफ-दक्षिण विभागात येणाऱ्या परिसरातील काही सखल भागात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विभागातील धोकादायक झाडांची छाटणी, साथीचे आजार पसरू नयेत म्हणून धूम्रफवारणी, रस्त्यावर पडलेला कचरा, राडारोडा, डेब्रिज तातडीने उचलून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरील आढावा बैठकीत केली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या एफ-दक्षिण विभाग कार्यालयात साहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह पालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी रखडलेल्या नालेसफाईला गती द्या, धोकादायक झाडांची वेळीच छाटणी करा, स्वच्छता, साफसफाईवर भर द्या, साथीचे आजार पसरू नये, यासाठी धूरफवारणी तसेच रस्त्यावर पडलेला राडारोडा, डेब्रिज तातडीने उचलावे, असे निर्देश आमदार अजय चौधरी यांनी दिले. बैठकीला माजी नगरसेवक सचिन पडवळ, दत्ता पोंगडे, अनिल कोकीळ, महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव, माजी नगरसेविका सिंधू मसुरकर, उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण, पराग चव्हाण, सर्व पुरुष-महिला शाखाप्रमुख, शिवडी विधानसभेतील पदाधिकारी, महापालिका अधिकारी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List