आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा – हिंदुस्थानची आठ सुवर्णांसह 24 पदकांची लयलूट
हिंदुस्थानी खेळाडूंनी दक्षिण कोरियात झालेल्या २६व्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 8 सुवर्णांसह 10 रौप्य आणि 6 कांस्य, अशी एकूण 24 पदकांची लयलूट करीत स्पर्धेची दमदार सांगता केली. शनिवारी अखेरच्या दिवशी हिंदुस्थानी खेळाडूंना एकही सुवर्णपदक मिळवता आलं नाही. मात्र, खेळाडूंनी तीन रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकून आपली चमक दाखवली. गतवेळी हिंदुस्थानी पथकाने 6 सुवर्णांसह 27 पदके जिंकली होती; पण यावेळी हिंदुस्थानी खेळाडूंनी 8 सुवर्णपदके जिंकली.
पारुल, सचिन, महिला रिले संघाला रौप्य
हिंदुस्थानी धावपटू पारुल चौधरी हिने महिलांच्या 5 हजार मीटर शर्यतीत 15 मिनिट 15.33 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावत स्पर्धेतील आपले दुसरे रौप्यपदक मिळवले. याआधी तिने 3000 मीटर स्टिपलचेसमध्येही रौप्यपदक जिंकले होते. याचबरोबर पुरुषांच्या भालाफेकमध्ये उत्तर प्रदेशच्या खेकडा गावचा 25 वर्षीय सचिन यादव याने 85.16 मीटर भाला फेकत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह रौप्यपदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 86.40 मीटर भालाफेक करीत सुवर्ण पटकावलं. याच स्पर्धेत हिंदुस्थानच्या यशवीर सिंग यानेही 82.57 मीटर भाला फेकून आपला सर्वोत्तम विक्रम नोंदवला आणि पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. याचबरोबर महिलांच्या 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत अभिनया राजराजन, स्नेहा एसएस, श्राबनी नंदा आणि नित्या गंधे या चौकडीने 43.86 सेकंदांत शर्यंत पूर्ण करत हिंदुस्थानला रौप्यपदक जिंकून दिले. ही वेळ स्पर्धेतील हिंदुस्थानची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
अखेरच्या दिवशी 3 रौप्य, तर तितक्याच कांस्यपदकांची कमाई
अनिमेष, विथ्या, पूजा यांना कांस्य हिंदुस्थानच्या अनिमेष कुजूर याने पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत 20.32 सेकंद वेळेत नवा राष्ट्रीय विक्रम रचत कांस्यपदक पटकावलं. ही वेळ त्याच्या मागील विक्रमापेक्षा (20.40 सेकंद) सरस होती. या शर्यतीत जपानच्या तोवा उजावाने 20.12 सेकंदांत सुवर्ण, तर सौदी अरेबियाच्या अब्दुलअजीज अताफीने 20.31सेकंदांत रौप्य जिंकलं, महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत तामीळनाडूच्या विध्या रामराज हिने 56.46 सेकंदांत कांस्यपदक जिंकले. ही स्पर्धा चीनच्या मो जियादीने 55.31 सेकंद वेळेत जिंकली. बहरीनच्या अडेकोयाने 55.32 सेकंदांत दुसरे स्थान मिळवले. याच शर्यतीत हिंदुस्थानच्या अनु राघवन हिला सातवे स्थान मिळाले. याचबरोबर महिलांच्या 800 मीटर स्पर्धेत पूजा हिने 2 मिनिट 01.89 सेकंद वेळेसह वैयक्तिक सर्वोत्तम प्रदर्शन करत कांस्यपदक मिळवले.
याराजी, कृष्णकुमार यांची निराशा
महिलांच्या 200 मीटर शर्यतीत ज्योती याराजी हिने 23.47 सेकंदांत पाचवे, तर नित्या गंधे हिने 23.90 सेकंदांत सातवे स्थान मिळवले. याराजीने याआधी 100 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले होते. पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत कृष्ण कुमार आणि अनु कुमार यांनी अनुक्रमे सातवे आणि आठवे स्थान मिळवले.
चीन, हिंदुस्थानने जपानला मागे टाकले
गतवेळी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या चीन व हिंदुस्थानने यंदाच्या 26व्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावरील जपानला मागे टाकण्याचा पराक्रम केला. चीनने 15 सुवर्ण, 8 रौप्य व 3 कांस्यपदकांसह 26 पदके जिंकून पदकतक्त्यात ‘नंबर वन’चे सिंहासन काबिज केले. हिंदुस्थानला 8 सुवर्ण, 10 रौप्य व 6 कांस्य, अशी एकूण 24 पदके मिळाली. जपानचा संघ 4 सुवर्ण, 10 रौप्य व 10 कांस्य, अशा एकूण 24 पदकांसह तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. गतवेळी थायलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत जपानने 16 सुवर्ण, 11 रौप्य व 10 कांस्य, अशी एकूण 37 पदके जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. त्यावेळी चीन 8 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य, असा एकूण 22 पदकांसह दुसऱ्या, तर हिंदुस्थान 6 सुवर्ण, 12 रौप्य व 9 कांस्य अशा एकूण 27 पदकांसह तिसऱ्या स्थानी होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List