Ratnagiri News – चिपळूणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडली; 23 लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई करत 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. कापसाळ येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गुटखा वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली. पोलिसांनी मुद्देमालासह एकाला अटक केली आहे. या घटनेमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
चिपळूण शहरात अनेक दिवसांपासून गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. शहरातील टपरींवर सर्रास गुटखा विकला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. अन्न व औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चिपळूणवासीयांकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
गुरुवारी (29 मे 2025) रात्री चिपळूण पोलिसांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुटख्याची गाडी चिपळूणमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कापसाळ येथे संशयास्पद गाडी थांबवली. गाडीची तपासणी केली असता, त्यात गुटखा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ गाडी जप्त करून चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 16 लाख 94 हजार रुपये आहे, तर गाडीची किंमत 7 लाख रुपये आहे. त्यामुळे एकूण 23 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सज्जन रामचंद्र नेवगी (वय 35) या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. चालकाला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार वृषाल शेटकर, पोलीस हवालदार संदीप मानके, पोलीस नाईक रोशन पवार यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी आता या गुटखा प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. हा गुटखा नेमका कोणत्या व्यावसायिकाला देणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, या गुटखा रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन गुटखा विक्रेत्यांना पकडण्यात अपयशी ठरले असताना पोलिसांनी महत्वपूर्ण कारवाई केली आहे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List