महाराष्ट्र अस्थिर; देशाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे, शाहू महाराजांची स्पष्ट भूमिका
गेल्या 60 वर्षांत कधी नव्हे तो महाराष्ट्र आज अस्थिर झाला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे देश एकाधिकारशाहीकडे झुकत आहे, अशी स्पष्ट भूमिका श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आज मांडली.
काल गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यू पॅलेस येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला अगदी मनापासून पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमुखाने आपल्याला उमेदवारीसाठी निवडले असे सांगतानाच शाहू महाराज यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. यापूर्वी आपण कधी राजकारणात नव्हतो, पण आता जनतेच्या आग्रहामुळेच मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाविरूद्ध लढा दिला. लोकांचे संरक्षण करणे, समतेचा जागर तेवत ठेवणे आणि या माध्यमातून विकास साधणे हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्ववाद आहे. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर आहे, असे त्यांनी सांगितले.
पक्षांतरबंदी कायदा फेल गेला
गेल्या 60 वर्षांत कधी नव्हे तो महाराष्ट्र आज अस्थिर आहे. पक्षांतरबंदी कायदा फेल गेल्यामुळे राजकीय अस्थिरता आहे. एकतर हा कायदा रद्द करावा किंवा मजबूत करावा, अशी मागणीही शाहू महाराजांनी केली.
महाविकास आघाडीला नेतृत्व देणे गरजेचे
देशाचा पाया काँग्रेस पक्षाने घातला. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काम केले. त्यांचे काम कमी लेखून चालणार नाही. पण समाजाला, राजकारणाला सुधारण्यासाठी जी दिशा दिली पाहिजे ते प्रयत्न करत नसल्याने सगळे पक्ष पंतप्रधान मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. भविष्यात राज्याचे राजकारण योग्य दिशेने न्यायचे असेल तर महाविकास आघाडीला नेतृत्व देणे गरजेचे आहे, असे शाहू महाराज यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List