नगरमधील भिंतींवर भाजपची विनापरवाना जाहिरातबाजी; तक्रारींनंतर नगर महापालिका ‘इन ऍक्शन’मध्ये
शहरात खासगी घरे, मालमत्ता तसेच सरकारी मालमत्तांवर भाजपकडून करण्यात आलेली विनापरवाना जाहिरातबाजी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बँकेच्या वाहनाचा वापर करत आहेत, अशा तीन तक्रारी महापालिकेच्या आचारसंहिता कक्षात दाखल झाल्या आहेत. त्याची दखल घेत महापालिकेकडून सरकारी मालमत्तांवरील भाजपच्या जाहिराती पुसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, बँक प्रशासनाला पदाधिकाऱयांची वाहने जमा करून घेण्याच्या सूचना आचारसंहिता कक्षप्रमुख उपायुक्त सचिन बांगर यांनी दिल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरात भाजपकडून अनेक सरकारी व खासगी मालमत्तांवर तसेच भिंतींवर जाहिराती रंगविण्यात आल्या आहेत. यासाठी महापालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावरही भाजपने या जाहिराती हटविल्या नाहीत.
अन्यथा आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा
नगर शहरातील हजारो घरांच्या भिंतींवर भाजपकडून जाहिराती रेखाटण्यात आल्या आहेत. त्यातील खासगी मालमत्तांवर विनापरवाना जाहिराती आहेत. याबाबत आचारसंहिता कक्षप्रमुख बांगर यांना विचारले असता, आचारसंहिता लागू झाल्याने संबंधित घर अथवा मालमत्ताधारकांनी स्वतः या जाहिराती झाकणे, हटवणे अथवा पुसून टाकणे आवश्यक आहे; अन्यथा संबंधितांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List