Lok Sabha Election 2024 – निवडणूक लढवण्याचा निर्णय का घ्यावा लागला? शाहू महाराजांनी केलं स्पष्ट
Kolhapur Lok Sabha Constituency News –
महाविकास आघाडीकडून काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांची गुरुवारी भेट घेतली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केली गेली. या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष ) अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचे उमेदवारी मिळाल्याबद्दल आभार मानले. जनतेच्या आग्रहामुळे निवडणुकीत उतरलो आहे, असे छत्रपती शाहू महाराजांनी सांगितले.
‘शाहू, फुले, आंबेडकर यांचा माझ्यावर मोठा प्रभाव’
महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरचा मोठा इतिहास आहे. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो. त्यांनी केलेले कार्य, देशाला दिलेली दिशा, अन्यायाविरोधात उभारलेला लढा, सामान्य जनतेसाठी, रयतेसाठी केलेले काम, हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आधुनिक काळात छत्रपती शाहू महाराजांनी केलेले कार्य, समतेचं कार्य आणि शिक्षणासाठी केलेले कार्य. या कार्यामुळे प्रभावित होऊन आपण इथेपर्यंत आलोय. तोच विचार जनतेमध्ये आहे. फुले, आंबेडकर यांचाही मोठा प्रभाव माझ्यावर आहे. या सर्वांचे विचार पुढे नेण्याचे काम माझे राहणार आहे, असे छत्रपती शाहू महाराजांनी सांगितले.
सर्व पक्षांचा हेतू हा एकच आहे, विकास करणे. पण कशाला प्राधान्य द्यायचे आणि कुठली गोष्ट मागे ठेवायची. तसेच महत्त्वाच्या मुद्द्यांना प्राधान्य देऊन विकासकामांवर लक्ष देणे गरजेचे आहे. विकासाला गती आणि दिशा देण्याचा आपला प्रयत्न असेल. शाहू, फुले, आंबेडकरांच्या समतेच्या विचारानुसार सर्व समाजांसाठी काम करणे आणि सोबत घेणे कर्तव्य आहे. शाहू महाराजांनी जी दिशा दिला आहे, त्या दिशेने आपण चालणार आहोत, असे छत्रपती शाहू महाराज म्हणाले.
‘हीच वेळ आहे आता…’
वर्षभरापूर्वी राजकारणात यावसं वाटत नव्हतो. प्रत्यक्ष राजकारणात आलो नव्हतो. तरीही राजकारणाच्या अवती-भोवतीच होतो. यामुळे त्या दृष्टीकोनातून नेहमी विचार व्हायचा. सर्व सुरळीत असल्यामुळे तेव्हा आवश्यकता वाटली नाही. आता कदाचित जनतेला वाटलं असेल ( Lok Sabha Election 2024 ) आपण अशा स्तरावर आलोय जिथे माझी आवश्यकता आहे. स्वतःला महत्त्व देण्याची माझी इच्छा नाही. हीच वेळ आहे आता महाराजांनी लक्ष घालण्याची, असं जनतेला वाटलं असणार. जनतेच्या रेट्यामुळे निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे छत्रपती शाहू महाराजांनी स्पष्ट केले.
पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. एकट्याने लढण्याचा प्रयत्न केला तर यश मिळणं कठीण होईल. म्हणून सर्व पुरोगामी विचाराच्या लोकांनी आणि पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच महाराष्ट्रात महाविक आघाडी निर्माण झाली आहे. या आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. इतर अनेकही पक्ष सहभागी होतील, अशी आशा आहे, असे शाहू महाराराजांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List