Operation Sindoor – पाकिस्तानने पुन्हा हल्ला केल्यास कठोर परिणाम भोगावे लागतील; पाकच्या कुरघोड्यांची कुंडली मांडत हिंदुस्थानने ठणकावलं
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला त्यांच्या नापाक कारवायांसाठी धडा शिकवला. यानंतरही पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा एक वाईट आणि अयशस्वी प्रयत्न केला. यामुळे हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. हिंदुस्थानच्या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाची दिल्लीत पत्रकार परिषद झाली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. तणाव वाढवण्याचा हिंदुस्थानचा हेतू नाही. आम्ही फक्त वाढत्या तणावाला प्रतिसाद देत आहोत. कोणत्याही लष्करी लक्ष्यांवर हल्ला केलेला नाही. आम्ही फक्त पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
Operation Sindoor- लढाऊ गणवेशात अवतरल्या हिंदुस्थानच्या रणरागिणी!
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असूनही त्याची जबाबदारी नाकारत आहे. जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंध असल्याचे मान्य केले आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची पाकिस्तानची मागणी देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पठाणकोट आणि मुंबई हल्ल्यांचे सर्व पुरावे हिंदुस्थानने दिले. पण पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही. ओसामा बिन लादेन कुठे सापडला आणि त्याला कोणी शहीद म्हटले होते? हे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दांत परराष्ट्र सचिवांनी पाकला फटकारले.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजात लपेटलेल्या ताबूतांमध्ये दहशतवाद्यांवर अंत्यविधी केले जात आहेत आणि त्यांना राजकीय सन्मान दिला जात आहे हे खूप विचित्र आहे. पाकिस्तानमध्ये कदाचित दहशतवाद्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची प्रथा असेल, अशी टीका करत परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानी सेना जनाज्यात सहभागी असल्याचा फोटोही दाखवला.
पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील शीख समुदायावर हल्ला केला. पूंछमध्ये एका गुरुद्वारावर हल्ला झाला. शीख समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य करण्यात आले, त्यांच्यावर हल्ला झाला आणि तीन लोक ठार झाले. पूंछमध्ये 16 नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार सीमाभागत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यामध्ये भारताच्या सर्वसमान्य नागरिकांचा जीव जात आहे. पण हिंदुस्थानने केलेल्या कारवाईत कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाचा जीव जात नाही. हिंदुस्थानने फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केला, असे परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले.
Operation Sindoor- जय हिंद! हिंदुस्थानी सैन्याची ही आहे बलाढ्य शक्ती, पाकिस्तानला आता पळता भुई थोडी
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हिंदुस्थानने पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी भागावर हल्ला केला नाही. पाकिस्तानने जर हिंदुस्थानवर हल्ला केला तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर मिळेल, असे हिंदुस्थानने स्पष्ट केले होते. त्यानंतर अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटसह हिंदुस्थानच्या 15 शहरांवर पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला. पण हिंदुस्थानने प्रत्युत्तर देत पाकचा हल्ला हाणून पाडला. त्यानंतर हिंदुस्थानने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या काही ठिकाणच्या रडार यंत्रणा निष्क्रिय केल्या. त्यामध्ये लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम ध्वस्त करण्यात आली. आज पाकिस्तानला उत्तर देण्यात आले आहे. जर पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. पाकिस्तानकडून पुढील कोणत्याही आगळीकला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल आणि दिले जात आहे, असा इशारा या पत्रकार परिषदेतून परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानला दिला.
यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. गेल्या 65 वर्षांमध्ये सिंधू कराराचे पालन करणे ही हिंदुस्थानची सहनशिलता आहे. यापुढे हिंदुस्थान आपल्या हक्काचे पाणी वापरणार आहे. असेही पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List