‘अबीर गुलाल’ फेम फवाद खान म्हणाला पाकिस्तान जिंदाबाद, भारताबद्दल वापरले संतापजनक शब्द

‘अबीर गुलाल’ फेम फवाद खान म्हणाला पाकिस्तान जिंदाबाद, भारताबद्दल वापरले संतापजनक शब्द

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरून आता पाकिस्तानी कलाकारांच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. हानिया आमिर, माहिरा खान यांसारख्या पाकिस्तानी अभिनेत्रींनंतर आता फवाद खानने सोशल मीडियाद्वारे भारताबद्दल संतापजनक शब्द वापरले आहे. भारताने केलेल्या या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत त्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असं म्हटलंय. याच फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार होता. परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावर भारतात थेट बंदी घालण्यात आली. या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार होता.

फवाद खानची पोस्ट-

‘या लज्जास्पद हल्ल्यात प्राण गमावलेल्या आणि जखमी झालेल्या कुटुंबीयांसाठी मी तीव्र दु:ख व्यक्त करतो. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो. माझी सर्वांना आदरयुक्त विनंती आहे, गोंधळ उडवणाऱ्या शब्दांनी आग पेटवणं थांबवा. निष्पाप लोकांच्या जीवाच्या किंमतीवर तरी नाही. सर्वांना सदबुद्धी मिळो, इन्शाल्लाह. पाकिस्तान जिंदाबाद’, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

माहिरा खान आणि हानिया आमिर या सेलिब्रिटींनीही भारताकडून झालेल्या हवाई हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. एकीकडे या हल्ल्यात एकही नागरिक मारल्याचा रिपोर्ट नसल्याचा दावा भारतीय सैन्याकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी नागरिकांनी यात जीव गमावल्याचा दावा पाकिस्तानकडून होत आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर याच पाकिस्तानी कलाकारांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. आता पहलगाम हल्ल्याचा सूड म्हणून भारताने एअर-स्ट्राइक केल्यावर पाकिस्तानी कलाकारांनी भारतावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात अनेक पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स बंद करण्यात आले आहेत. यात फवाद खान, हानिया आमिर, माहिरा खान, आतिफ अस्लम यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनल्ससुद्धा भारतात बंद करण्यात आले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;