WAVES म्हणजे भारतीय सिनेमाचा ग्लोबल गेटवे… काय आहे कॉन्सेप्ट, जाणून घ्या
भारतीय सिनेमा ग्रेट शोमॅन राज कपूर यांच्या काळापासून ग्लोबल आहे. राज कपूर यांचे चित्रपट पूर्व सोव्हीएत संघापासून ( रशिया ) ते चीन आणि संपूर्ण आशियातील देशात प्रसिद्ध आहेत. राज कपूर यांच्या आधी लंडन ते पॅरिसमध्ये देविका राणी आणि हिमांशू रॉय सारख्या चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्त्वांचे वर्चस्व राहिले आहे. सत्तर आणि ऐंशी ते नव्वदच्या दशकात, जेव्हा भारतीय चित्रपट अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, रजनीकांत, शाहरुख खान, सलमान खान, हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा यांसारख्या स्टार्सच्या काळातून जात होता तेव्हा तो पूर्वीपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय बनला होता. जगात असा कोणताही देश नाही जिथे भारतीय कला आणि मनोरंजन जगताच्या कामगिरी पोहोचली गेली नाही. या संदर्भात WAVES समिट 2025 महत्त्वाचे असून ते निर्मात्यांना योग्य पद्धतीचे व्यासपीठ मिळाले आहे.यामुळे नवीन पिढीतील कलाकारांमध्ये सकारात्मक उत्साह संचारला आहे.
अलिकडच्या वर्षात भारतीय मनोरंजन इंडस्ट्रीचा ग्लोबल इम्पॅक्ट आणखी वेगाने वाढला आहे. असे पाहायला मिळालय की हॉलीवूड, कोरिया, चीन,इराणी वा रशियन सिनेमा प्रमाणे भारतीय सिनेमा देखील आता संपूर्ण ग्लोबल स्टँडर्डनुसार जगात पुढे येत आहे. या तंत्रात दक्षिण भारतीय सिनेमा तर बॉलीवूड पेक्षाही एक पाऊल पुढे असून थेट हॉलीवूडला टक्कर देत आहे. गुरुवारी वेव्स परिषदेतील एका चर्चा सत्रात पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जून यांनी म्हटले देखील की आम्ही जगाच्या प्लॅटफॉर्मवर वेगाने पुढे जात आहोत. म्हणजेच व्हेव समिट भारतीय सिनेमाचे ग्लोबल गेटवे बनला आहे.
बॉलीवुडला संकटातून बाहेर पडायचं आहे….
भारतीय चित्रपटसृष्टी अलिकडे आर्थिक संकटातूनही जात आहे. संपूर्ण वर्षभरात पाचशेहून अधिक सिनेमे तयार झाले असले तरी मोजकेच सिनेमे ब्लॉकब्लास्टर झाले तर बहुतांशी सिनेमे जोरदार आपटले. अशात WAVES चा हेतू या निराशेतून भारतीय सिनेमा बाहेर काढणे आणि सिनेमाला नव्या संस्कृतीवर नेणे हा होता. या परिषदेत चित्रपट जगातील अनेक दिग्गज उदाहरणार्थ अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, आमिर खान आदी तारकांची मांदियाळी जमली होती.या परिषदेचे या कलाकारांनी कौतूक केले. आणि भविष्यात WAVES पुरस्कार सुरु करण्याची रणनितीही ठरली आहे.
भारताला ग्लोबल पॉवर बनायचं आहे
वास्तवात WAVES समिटचा उद्देश्य क्रिएटीव्हीटीला प्रोत्साहित करणे आणि डिजिटल कंटेंट सह भारताला ग्लोबल पॉवरच्या रुपात स्थापित करणे हे आहे, भारतीय सिनेमा नेहमीच संपूर्ण जगाचे भरपूर मनोरंजन करतो.आजच्या तारखेत अमेरिकेत भारतीय सिनेमे खूपच गाजत आहेत. हिंदी चित्रपटांचा प्रभाव जगावर इतका आहे की अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच शाहरुख खान याचा प्रचंड लोकप्रिय सिनेमा दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटांचा उल्लेख करीत केली होती. ते… बडे बडे देशों में..हा डायलॉग म्हणाले..जगातील सुपरपॉवर असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला हिंदी चित्रपटाचा डायलॉग तोंडपाठ होता. मिथुन चक्रवर्ती यांचा डिस्को डान्सर चित्रपट रशियापासून ते चीनपर्यंत ब्लॉकब्लास्टर झाला होता.
या परिषदेचे उद्देश्य भारतीय कला आणि मनोरंजनाला उजाळा देणे आणि जागतिक व्यासपीठावर प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. प्राचीन काळातही भारत जगात अग्रेसर होता आणि आज ज्या प्रकारे जागतिक स्तरावर भारताची कीर्ती ज्या वेगाने वाढत आहे, त्याचा फायदा चित्रपट जगतानेही घेतला पाहिजे असे परिषदेत बिंबवण्यात आले आहे.
भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्वांचा जगात प्रभाव
आज,भारताची अर्थव्यवस्था सतत वाढत आहे. प्रसारण, चित्रपट, डिजिटल मीडिया, इन्फोटेनमेंट इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये भारत जागतिक स्तरावर एक विकसित देश म्हणून उदयास येत आहे. गुरु दत्त यांची सिनेमॅटिक कविता, सत्यजित रे यांचे कलात्मक चित्रीकरणाचे चित्रपट आणि आरआरआर चित्रपटातील गाण्याचा ऑस्करमध्ये सन्मान होणे, ऋत्विक घटक यांचा सामाजिक आशय, एआर रहमान यांचे संगीत, एसएस राजामौली यांचे दिग्दर्शन या महाकाव्य ठरलेल्या आरआरआर चित्रपटाची जगभरात सर्वांनी चर्चा केली आहे. आणि हे अव्याहतपणे सुरूच आहे. भारतीय चित्रपटांचा जगाशी असलेला संपर्क पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे आणि भारतात जसे जागतिक चित्रपटांचे प्रेक्षक निर्माण केले आहेत तसेच भारतीय चित्रपटांनीही जागतिक प्रेक्षक तयार केले आहेत.
भारत हे मनोरंजनाचे जागतिक केंद्र…
WAVES च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी WAVES समिटचे खूप कौतुक केले आणि त्याची उपयुक्तता विशद केली. भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल सामग्री, फॅशन आणि संगीताचे जागतिक केंद्र बनत आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगत भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली असल्याचे सांगितले. भारत आणि येथे जमलेल्या सर्व देशांतील निर्मात्यांनी या व्यासपीठाचा पुरेपूर फायदा घ्यावा. पंतप्रधान मोदींनी यावर भर दिला की भारताकडे कथांचा खजिना आहे. चित्रपट निर्मितीमध्ये या कथांचा फायदा घेतला पाहिजे. यावर चित्रपट बनवले पाहिजेत. ते नवीन पिढीसमोर आले पाहिजेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
चित्रपट ही कथा सांगण्याची कला, ती विकसित करणे
WAVES समिट १०० हून अधिक देशांमधील कलाकार, स्टार्टअप उद्योजक, गुंतवणूकदार आणि निर्माते एकत्र आणते. WAVESचे उद्दिष्ट प्रतिभा आणि सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ प्रदान करणे आणि जागतिक स्तरावर त्याचा प्रसार करणे आहे. याद्वारे, संस्कृती, सर्जनशीलता आणि वैश्विक संवादाला प्रोत्साहन देणे हे WAVESचे उद्दिष्ट आहे. चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथाकथन याद्वारे त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी WAVES ला एक परिपूर्ण व्यासपीठ बनवणे हा या परिषदे मागचा उद्देश आहे. जेणेकरून नवीन कलाकार आणि उद्योजक ही मोहीम समजून त्यात सामील होतील.WAVESचे मुख्य लक्ष्य मनोरंजन उद्योगातील नवे प्रयोग करणे हा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List