IPL 2025 – चेन्नई पराभवांची मालिका रोखणार, आज बंगळुरूविरुद्ध औपचारिक लढत
पाच वेळा चॅम्पियन ठरलेला आणि नेहमीच प्ले ऑफमध्ये सर्वप्रथम स्थान मिळवणाऱया चेन्नईने स्पर्धेतून बाद होण्यात पहिला नंबर पटकावलाय. त्यामुळे प्ले ऑफच्या उंबरठय़ावर असलेल्या बंगळुरूला पराभवाचा धक्का देत आपल्या पराभवांची मालिका खंडित करण्यासाठी बेचैन चेन्नई आपला जोर लावणार यात वाद नाही. मात्र या औपचारिक लढतीत चेन्नईसाठी विजयाचे महत्त्व फारसे उरले नसले तरी पराभवांचे दुख कमी करण्याचे ते नक्कीच प्रयत्न करतील. शनिवारची संध्याकाळ ही हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींसाठी ‘ब्लॉक बस्टर’ नाईट ठरणार आहे.
यंदाच्या आयपीएलच्या प्ले ऑफचे गणित हे अधिक क्लिष्ट झाले आहे. कोणते चार संघ प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के करतील याबाबत अद्याप सुस्पष्टता आलेली नाही. पण बंगळुरूला ही किमया साधता येऊ शकते. 14 गुणांसह दुसऱया स्थानावर असलेल्या बंगळुरूला चेन्नईचा पराभव करून प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के करता येईल. सध्या बंगळुरू तुफान फॉर्मात असून विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय; तर जॉश हेझलवूड, भुवनेश्वर पुमार, पृणाल पंडय़ा हे उत्तम गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना जखडून ठेवत आहेत. सध्या विराट कोहलीचा फॉर्म आणि बंगळुरूकडून होणारी सांघिक खेळी यामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी यंदाचे आयपीएल बंगळुरू जिंकेल असे भाकीत आतापासूनच वर्तवले आहे.
दुसरीकडे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी असणारा चेन्नईचा संघ सर्वप्रथम बाद झाल्याने त्यांचे मनोधैर्य खचलेय. गेल्या काही सामन्यांत रवींद्र जाडेजा फलंदाजीची धुरा सांभाळताना दिसत असून, त्याला डेवाल्ड ब्रेव्हिस याची साथ मिळत आहे. तसेच सॅम करणच्या बॅटमधूनदेखील काही धावा निघत आहेत. मात्र, इतर फलंदाज म्हणावे तसे धावा करताना दिसत नाही. तर, गोलंदाजीतसुद्धा चेन्नईला अपेक्षित यश मिळवता येत नाहीय. त्यामुळे उद्याच्य सामन्यात बंगळुरूचेच पारडे जड राहण्याची शक्यता आहे.
कोहलीच्या आठव्यांदा पाचशे धावा
सध्या फॉर्मात असलेला विराट कोहली 443 धावांवर खेळतोय. अजून त्यांचे चार सामने शिल्लक असून त्याला आयपीएलमध्ये चक्क आठव्यांदा 500 पेक्षा अधिक धावांचा विक्रम करण्याची संधी आहे. जर कोहली आजच्या सामन्यात 57 धावा करतो तर तो डेव्हिड वॉर्नरचा 7 वेळा पाचशेपेक्षा अधिक धावांचा विक्रम मोडीत काढेल. कोहलीने गेल्या मोसमातही 741 धावा केल्या होत्या, तर 2016च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक 973 धावा करून त्याने सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केला आहे, जो आजही अबाधित आहे. विराटने आतापर्यंत 557 (2011), 634 (2013), 503 (2015), 973 (2016), 530 (2019), 639 (2023) आणि 741 (2014) अशा पाचशेपेक्षा अधिक धावा एका मोसमात केल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List