‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत विजय देवरकोंडाच्या किसिंग सीनची तुफान चर्चा
साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचा आगामी ‘किंग्डम’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यातील रोमँटिक सीनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. ‘हृदयम लोपाला’ असं या गाण्याचं नाव आहे. या चित्रपटात विजयसोबत मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री बोरसे मुख्य भूमिकेत आहे. गाण्यात विजय आणि भाग्यश्रीच्या किसिंग सीनची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ‘किंग्डम’ हा चित्रपट तेलुगूसोबतच तमिळ आणि हिंदीतही प्रदर्शित केला जाणार आहे.
अनिरुद्ध रविचंदर आणि अनुमिता नादेसन यांच्या आवाजातील ‘हृदयम लोपाला’ या गाण्याचे बोल कृष्णकांत यांनी लिहिले आहेत. या प्रोमोच्या सुरुवातीला भाग्यश्री आणि विजय एका समुद्रकिनारी बसलेले दिसत आहेत. त्यानंतर या दोघांचा लिपलॉक सीन आहे. या गाण्याचा प्रोमो पोस्ट करत विजयने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘विश्वासघाताच्या छायेत, नात्यांच्या दिखाव्यात एक अजबचं आकर्षण आहे.’ हे गाणं प्रत्येकाला आवडेल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.
प्रोमो व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा विजय आणि भाग्यश्रीच्या जोडीचं कौतुक करत आहेत. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. त्याचप्रमाणे विजयसोबत पहिल्यांदाच झळकलेली ही अभिनेत्री आहे तरी कोण, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तर भाग्यश्री बोरसे ही मूळची छत्रपती संभाजीनगरची असून एका मराठी कुटुंबात तिचा जन्म झाला. भाग्यश्री 26 वर्षांची असून तिच्या जन्मानंतर काही वर्षांतच तिचं कुटुंब नायजेरियाला स्थलांतरित झालं होतं. त्यामुळे भाग्यश्रीचं शिक्षण नायजेरियातच झालं. सात वर्षे तिथं राहिल्यानंतर ती भारतात परतली. इथं तिने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी संपादित केली. शिक्षणासोबतच ती मॉडेलिंगसुद्धा करत होती. भाग्यश्रीने ‘यारियाँ’, ‘चंदू चॅम्पियन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय ती काही जाहिरातींमध्येही झळकली आहे.
हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर भाग्यश्रीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे तिचा मोर्चा वळवला. गेल्या वर्षी तिने रवी तेजासोबत ‘मिस्टर बच्चन’ या चित्रपटात काम केलं होतं. तर दुलकर सलमानसोबत ती लवकरच ‘कांता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List