फोटो पोस्ट करण्याआधी लहान मुलांची परवानगी घ्यावी का? प्रत्येक पालकाला पटेल असं मराठमोळ्या अभिनेत्रीचं उत्तर
सोशल मीडियावर आपण लहान मुलांसोबतचे फोटो पोस्ट करताना त्यांची परवानगी घेण्याचा विचारसुद्धा करत नाही. परंतु याच छोट्याशा गोष्टीमधून आपण लहान मुलांना नकळत खूप मोठी शिकवण देऊन जातो, हे मराठमोळी अभिनेत्री मानसी साळवीने पटवून सांगितलं आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत मानसी लहान मुलांच्या ‘Consent’ बद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी तिने मांडलेलं मत अनेक नेटकऱ्यांनाही पटलं आहे. मानसीने यावेळी तिच्या मुलीचंही उदाहरण दिलं आहे.
काय म्हणाली मानसी?
“पब्लिक स्पेसमध्ये बोलायला एक कन्सेंटची (संमती) गरज असते. आज मी माझ्या मुलीबद्दल जरी बोलत असले तरी याविषयी मी तिच्याशी काल बोलले की, मी एका पॉडकास्टवर जाणार आहे. तिथे मी कदाचित तुझ्याविषयी बोलू शकते. आपण लहान मुलांची परवानगी घेत नाही किंवा त्यांच्या स्पेसचा आदर करत नाही किंवा लहान मुलांसोबत फोटो काढला तर पटकन आपण तो सोशल मीडियावर पोस्ट करतो. आपण त्या मुलाला विचारत नाही. आई-मुलाचं नातं इतकं काय फॉर्मल आहे.. हे त्याबद्दल नाही. पण यातून तुम्ही नकळत मुलाला शिकवताय की कन्सेंट गरजेचं असतं,” असं ती म्हणाली.
याविषयी तिने पुढे सांगितलं, “माझ्या मुलीने माझ्या खोलीत येण्याआधी दार ठोठवावं अशी मी अपेक्षा करत असेन तर तोच नियम माझ्याबाबतही लागू होतो. ती माझी मुलगी आहे, म्हणून मी थेट तिच्या खोलीत जाऊ शकत नाही. ही सर्वांत सामान्य आणि सोपी गोष्ट आहे, ज्यातून तुम्ही तुमच्या मुलांना शिकवताय की, मी तुझ्या स्पेसचा आदर करते, तू माझ्या स्पेसचा आदर करतेस आणि पुढेही तू हे लक्षात ठेवावं.”
मानसीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘मीसुद्धा सहमत आहे. संमती फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती लहान मुलांना शिकवायला पाहिजे’, असं एकाने लिहिलं. तर ‘खरंय, माझ्या मुलालाही त्याचे फोटो मी स्टोरी किंवा स्टेटसला टाकलेलं आवडत नाही. त्यामुळे संमती महत्त्वाची असते आणि मीसुद्धा त्याच्या भावनांचा आदर करते’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘एक साधी गोष्ट आहे, पण त्यातूनच मुलाला चांगली शिकवण मिळते. प्रत्येक पालकाने त्याच्या दैनंदिन जीवनात त्यांच्या मुलांसमोर कोणती उदाहरणं ठेवतोय याची जाणीव ठेवेल का? असं झाल्यास ते मूल किती अद्भुत माणूस बनेल’, असं मत नेटकऱ्याने मांडलंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List