कोकणची पोरं हुशार, प्रशासन मात्र ठरलेय ‘ढ’, कोकणातील विद्यार्थ्यांच्या विक्रमी कामगिरीचे रेकॉर्डच गायब
दुर्गेश आखाडे, रत्नागिरी
कोकणची पोरं हुशार… या हुशार पोरांनी केलेल्या रेकॉर्डब्रेक कामगिरीचे रेकॉर्डच कोकण बोर्डातून गहाळ झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2012 आणि 2013 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षांचे निकालाचे रेकॉर्डच कोकण बोर्डातून गहाळ झाले आहे. 2012 आणि 2013 मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल किती टक्के लागले याची कोणतीही माहिती कोकण बोर्डाकडे सध्या उपलब्ध नाही ही शोकांतिका आहे. कोकणची पोरं हुशार मात्र निकालाचा दस्ताऐवज जपून ठेवण्यात कोकण बोर्ड प्रशासन मात्र ‘ढ’ ठरले आहे.
पूर्वी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे कोल्हापूर बोर्डाला जोडलेले होते. स्वतंत्र कोकण बोर्डाची मागणी अनेक वर्षे सुरू होती. अखेर या मागणीला 2011 मध्ये यश आले. मार्च 2012 मध्ये कोकण बोर्डाची बारावीची पहिली परीक्षा झाली. स्वतंत्र कोकण बोर्ड सुरू झाल्यामुळे अनेकांच्या प्रयत्नांना यश आले. कोकण बोर्ड सुरू होताच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळाला, बारावीच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेतच कोकण बोर्डाने राज्यात झेंडा फडकावला. दुसऱ्या परीक्षेतही हा अव्वल नंबर कोकणातल्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवला होता आणि तिथून पुढे सलग 13 वर्षे आपले अढळ स्थान कोकणातील विद्यार्थ्यांनी कायम ठेवले.
अल्प मनुष्यबळ आणि स्व इमारतीची प्रतिमा
कोकण बोर्डात लिपिकांची अनेक पदे रिक्त आहेत. लिपिकाच्या 24 पदांपैकी फक्त आठ पदे कार्यरत आहेत. तसेच कोकण बोर्डाच्या नव्या इमारतीचे कामही पूर्ण झालेले नाही. रिक्त पदांमुळे कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.
निकालाची टक्केवारीही सांगता येत नाही
कोकणातील विद्यार्थ्यांच्या हुशारीने राज्यात आपला दबदबा निर्माण केलेला असताना कोकण बोर्डाच्या प्रशासनाचा ढिम्म कारभार पुढे आला आहे. मार्च 2012 आणि मार्च 2013 मध्ये झालेल्या परीक्षांचे निकालच कोकण बोर्डाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोकण बोर्डाकडे निकालाची आकडेवारी मागितली तर ती मार्च 2014 पासूनची उपलब्ध आहे.
बारावीच्या निकालाची पहिल्या दोन वर्षांची आकडेवारी आमच्याकडे नाही. मात्र दहावी आणि बारावी या वेगवेगळ्या शाखा असल्यामुळे दहावीची सर्व वर्षांची आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे. – सुभाष चौगुले, विभागीय सचिव, कोकण बोर्ड
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List