Pahalgam Terror Attack – टुरिस्ट कंपन्या अलर्ट; पर्यटकांमध्ये भीती
दहशतवादी हल्ल्यामुळे टुरिस्ट पंपन्या अलर्ट मोडवर गेल्या असून पर्यटकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तेथील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे टुरिस्ट कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. पर्यटकांना संवेदनशील भागात नेले जात नाही. शिवाय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळनंतर पर्यटनही केले जात नाही, असे टूर्स कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपले पर्यटक सुरक्षित असल्याचे टूर्स कंपन्यांकडून सांगण्यात आले.
सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने हजारोंच्या संख्येने पर्यटक जम्मू-कश्मीरमध्ये थंड हवेचा आनंद लुटण्यासाठी गेले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून जम्मू-कश्मीरमध्ये वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे पर्यटक आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शिवाय आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे टूर्स कंपन्यांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला टूर्स माध्यमातून नव्हे तर वैयक्तिकरीत्या गाडय़ांनी गेलेल्या पर्यटकांवर आणि रात्रीच्या वेळी झाल्याचेही टूर्स कंपन्यांचे म्हणणे आहे. आमच्या टूर्सच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी आणि संवेदनशील भागात पर्यटकांना नेले जात नसल्याचेही टूर्स कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.
पर्यटकांकडून सुरक्षित असल्याचे ‘कॉल’
मुंबईतून गेलेल्या सर्व पर्यटकांकडून आपण सुरक्षित असल्याचे कॉल आल्याचे टूर्स कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्यासंदर्भात किंवा सध्या तरी अर्धवट सोडून परतण्यासंदर्भात कोणताही कॉल आला नसल्याचे मुंबईतील टूर्स कंपन्यांचे म्हणणे आहे.
उन्हाळी सहलीच्या माध्यमातून सध्या आमचे दहा गटांच्या माध्यमातून 500 पर्यटक जम्मू कश्मीरमध्ये पाठवण्यात आले आहेत. हे सर्व पर्यटक सुखरूप आहेत. शिवाय संवेदनशील भागापासून आम्ही दूर राहत असल्यामुळे आणि सायंकाळनंतर पर्यटनासाठी जात नसल्यामुळे आमचे पर्यटक नेहमीच सुखरूप परततात. – झेलम चौबळ, डायरेक्टर, ‘केसरी’ टूर्स
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List