‘माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला..’; वडिलांच्या निधनानंतर किरण माने यांची भावूक पोस्ट

‘माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला..’; वडिलांच्या निधनानंतर किरण माने यांची भावूक पोस्ट

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांच्या वडिलांचं निधन झालं. निधनानंतर त्यांनी वडिलांसोबतच्या काही खास आठवणी फोटोरुपात शेअर करत इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. ज्या शांतसरळ मार्गानं जगले, तसेच शांतपणे गेले.. असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी किरण माने यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आयुष्यातून बापाचं निघून जाणं म्हणजे खूप मोठा आघात असतो. कुटुंबातल्या प्रत्येकाला या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर आपणास देवो हीच प्रार्थना आणि दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,’ असं एकाने लिहिलंय. ‘वडील म्हणजे आपल्या पाठीशी असलेला आधाराचा उत्तुंग हिमालय. याची खरी किंमत ते गेल्यानंतर पावलोपावली जाणवते,’ असं दुसऱ्याने म्हटलंय.

किरण माने यांची पोस्ट-

‘माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी.. खूप धावपळ सुरू होती माझी. कोल्हापूरला इंद्रजीत सावंतांचा सत्कार झाला. नंतर चंद्रपूरला आंबेडकरी अस्मिता परिषदेसाठी गेलो. तिथून नागपूरला येऊन रात्री बाराच्या फ्लाईटनं पुणे एअरपोर्टवर उतरलो. दुसर्‍या दिवशीपासून नाशिकला शुटिंग सुरू होणार होतं. एक दिवसासाठी कशाला सातारला जायचं? शुटिंग संपल्यावर जाऊ सातारला, या विचारानं मी नाशिकला निघालोच होतो. पण बायकोच्या आग्रहाखातर अचानक निर्णय बदलला. गुढी पाडव्याच्या दिवशी सातारला घरी तीन-चार तास थांबून मग नाशिकला जाऊ असं ठरवलं आणि सातारला आलो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

दादांच्या जवळ जाऊन बसलो. ते खुर्चीत शांत बसले होते. म्हटलं, “दादा मी नाशिकला चाललोय आजच लगेच.” काही बोलले नाहीत. फक्त हातानं खुणावलं की ‘शेजारी बस.’ मी बसलो पण दादा काहीच बोलेनात. मला वाटलं त्यांना झोप आलीय. त्यांना बेडवर झोपवण्यासाठी मी आणि बायकोनं दोन्ही बाजूनं उचललं तर पायातला जीव गेल्यासारखे अलगद खाली बसले. माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शेवटचा श्वास घेतला.

ज्या शांतसरळ मार्गानं जगले, तसेच शांतपणे गेले. दादा, तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या असतील तर फक्त याच ठेवल्या की, ‘चांगला माणूस हो, पैसा कमव पण चुकीच्या मार्गाने कमावू नकोस, प्रामाणिकपणा सोडू नकोस, सत्य बोलायला घाबरू नकोस आणि गोरगरिबांना यथाशक्ती मदत कर.’ दादा, काल तुमचे जुने मित्र आले होते. ते म्हणाले, “तुझ्या वडिलांकडे सुखी माणसाचा सदरा होता.” तो सदरा याच गुणांमुळे तुम्ही कमावला होतात दादा आणि तोच तुम्ही वारशात ठेवला आहे. जगी ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तीस जावा,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;