परीक्षण – जोखडबंद देशाची व्यथा

परीक्षण – जोखडबंद देशाची व्यथा

>> प्रसाद सावंत

जीवनरहाटी बदलण्यासाठी व्यक्त होणारी कविता : `व्यक्त होतोय मी’ कवी विलास गावडे यांच्या `व्यक्त होतोय मी’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील कविता वाचनात आल्या. त्यांच्या या कवितेतून व्यक्त होते ती एक लोकशाहीत जगत असूनही स्वातंत्र्य हिरावलेली, केवळ एका मेंढराप्रमाणे जीवनरहाटी असलेल्या लोकांच्या पारतंत्रीय व त्यातही जोखडबंद झालेल्या देशाची व्यथा. त्यातही निर्भीडता ही उपजत प्रवृत्ती असलेल्या, पण चिकित्सकाच्या वृत्तीने निर्माण झालेला संशय जाहीर करताना तो म्हणतोय…

संविधानाचा भंग होऊ नये म्हणून
लेखनावर अन् वाचनावर बंदी आणण्याऐवजी
सरकारने हा सुलभ मार्ग शोधला असावा का?
मला आता दाट संशय येतोय!

मला आता दाट संशय येतोय… यात कवी व्यक्त होतानाच सभोवतालच्या वास्तवाचे भान सतत बाळगताना दिसतो. या काव्यसंग्रहात कवी सध्याच्या वास्तव जीवनाचे अनुभव अधोरेखित करताना जितका आाढमक होताना दिसतो तितकाच तो प्रसंगी भावुक व आध्यात्मिकही असतो. पण असे असले तरी आध्यात्मिकतेने येणारा अंधश्रद्धाळूपणा तो जाणीवपूर्वक नाकारताना दिसतो. कारण समाज वास्तवाचे भान राखण्यासोबतच कवी सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीनुसार येणारे व बदलत जाणारे समाजकारणही कवी जाणून आहे. त्यामुळेच तो प्रसंगी त्यावरही आपले आसूड ओढायला विसरत नाही.

जमुरे! तू दगडाला शेंदूर फासून
त्याला देवत्व देऊन पूजा करत होतास
हे समजलं नाही का रे?

जमुऱ्याची एक संकल्पना किंवा प्रतीक वापरून कवी व्यवस्थेवरचे ताशेरे ओढताना आजची आपली संपूर्ण पिढीच सत्ताधाऱयांच्या तालावर नाचतेय. (नाच जमुरे नाच!) आपणही तिला आपल्याला वापरू देतोय ही भावना तसेच वास्तव जळजळीतपणे कवी लोकांसमोर ठेवू पाहतोय. गावडेंच्या आजवरच्या रचनांवर एक ओझरती दृष्टी टाकली तरी हा फरक नक्की जाणवेल. निर्भीडता आणि रोखठोकपणा हा या कवीचा उपजत स्थायीभाव आहे, तो त्याच्या वृत्तीतला एक भाग आहे.

अगोदरचं वृद्ध जोडपं
व्याकुळतेनं माझ्याकडे बघत होतं
मी क्षणभर त्यांच्याकडे बघितलं
आणि समोरच्या हॉटेलात जाऊन
भाजी-भाकरी घेऊन आलो
अन् त्यांना देऊन नमस्कार केला

दर्शन या कवितेच्या अंतरंगाकडे आणखी डोकावून पाहिले तर कवीच्या मनात असलेली श्रद्धा ही केवळ मूर्तिपूजकाची नसून त्यात आपल्या मानसिकतेलाही तो भाबडय़ा आवरणाचे कोंदण न देता ती मानसिकता अंगी बाणवण्याचा प्रामाणिक तसेच सच्चा व्यावहारिक मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करताना दिसतो. यासोबतच कवी लोकांनी निर्माण केलेल्या व लोकमान्यतेतून प्रस्थापित झालेल्या व श्रद्धास्थानी बसलेल्या बाबा आदि कल्पनांना ती अगदी लोकमान्यता आहे म्हणून स्वीकारायला तयार होत नाही. पण त्याबाबतीत आपला संभ्रम प्रामाणिकपणे विनापार कबूल न करता निर्भीडपणे, निर्भयपणे नमूद करतो व व्यक्त होतो.

प्रतीके निवडतानाही कवी अगदी साध्या व्यवहारातील प्रतीकांचीच निवड करून वेडय़ा धर्मभावनेच्या वृत्तीला हलकेच हात घालतो व त्यावर प्रहार करतो आणि त्यामागच्या लपलेल्या वा लपवलेल्या सत्याची उकल करून जातो.

लोकं चित्रपट गृहातून बाहेर आली
समोर येणाऱ्या लोकांना पेटवू लागली
त्यांच्या धर्माची खातरजमा न करता
दंगल पेटली, पेटलेल्या दंगलीच्या चुलीवर
राजकारण्यांनी भाकऱयाच भाजल्या
आपाआपल्या धर्माच्या गोळ्या लोकं
चघळत राहिली …

कवीची आरपार भेदणारी भेदक नजर चौफेर फिरताना ती सर्वसमावेशक बनून आपल्यासभोवती घडणाऱया प्रत्येक घटनेकडे चिकित्सक दृष्टीने आकलन करीत त्यावर भाष्य करू पाहते. मग ती घटना सामाजिक असो वा राजकीय, तिचे पडसाद हे मनाच्या संवेदनशीलतेला बोलण्याचे धाडस देतातच. त्याच धाडसातून कवीचे देशप्रेम मोकळेपणाने व्यक्त होतेच. पण ते व्यक्त होताना वास्तवता नाकारत नाही हे विशेष.

थोडक्यात, विलास गावडेंचा हा संग्रह म्हणजे कवीच्या सर्वांगीण अनुभूतीचे निर्भीडपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे हेच सुचवू पाहतो.

व्यक्त होतोय मी (काव्यसंग्रह)
कवी : विलास गावडे
प्रकाशन : संवेदना प्रकाशन, पुणे
मूल्य : 160 /- पृष्ठे : 96

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;