‘छावा’मधील लेझीमच्या सीनबद्दल अखेर विकी कौशलने सोडलं मौन; म्हणाला “जर शिवप्रेमींना..”

‘छावा’मधील लेझीमच्या सीनबद्दल अखेर विकी कौशलने सोडलं मौन; म्हणाला “जर शिवप्रेमींना..”

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका सीनवरून वाद निर्माण झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा लेझीम नृत्याचा हा सीन होता. अखेर या वादानंतर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सल्ल्यानंतर दिग्दर्शकांनी तो सीन चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. “चित्रपटातील लेझीम नृत्याचे सीन्स आम्ही डिलिट करणार आहोत. राज ठाकरेंनीही मला तोच सल्ला दिला. त्या सीनमध्ये आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण त्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचले नसतील, तर तो सीन आम्ही काढून टाकू,” असं उतेकरांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याने लेझीमच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विकी गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला होता. याठिकाणी माध्यमांशी बोलताना त्याला चित्रपटातील ज्या सीनवरून वाद निर्माण झाला, त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “शिवगर्जनेशिवाय आम्ही शूटिंगची सुरुवात केली असेल, असा एकही दिवस नव्हता. चित्रपटात महाराजांच्या लेझीमचा प्रसंग फक्त वीस ते तीस सेकंदांचा होता. तो कथेचा भाग नव्हता. पण महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचावी म्हणून तो सीन त्यात समाविष्ट करण्यात आला होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

“छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यामुळे जर एखाद्याने त्यांना त्यांच्यासोबत लेझीम खेळण्याची विनंती केली असेल तर राजेंनी ते नक्कीच ऐकलं असेल. पण जर शिवप्रेमींना त्या सीनबद्दल आक्षेप असेल तर आम्ही तो सीन वगळणार असल्याचं जाहीर केलंय. तो सीन चित्रपटातील महत्त्वपूर्ण भाग नाहीये”, असं विकीने सांगितलं.

याविषयी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्यांचे विचार स्पष्टपणे मांडले होते. ते म्हणाले, “इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत. मग नेमका हात कुठे घालायला म्हणून आम्ही ‘छावा’ या कादंबरीचे अधिकृत हक्क विकत घेऊन त्यावर आधारित हा चित्रपट बनवला आहे. ‘छावा’ या कादंबरीत लिहिलंय की छत्रपती संभाजी महाराज हे होळी हा उत्सव साजरा करायचे, होळीच्या आगीतून तो नारळ खेचून घ्यायचे. लेझीम हा आपला पारंपरिक खेळ आहे, त्यात आजचे कुठले डान्स स्टेप्स आहेत असं नाही. आपल्याला लाज वाटावी, असं त्यात काहीच नाही. महाराज कधी लेझीम का खेळले नसतील, हा प्रश्न नेहमी उभा राहतो. त्यावेळी ते वीस वर्षांचे होते. जेव्हा महाराजांनी बुरहानपुरवर हल्ला केला, बुरहानपूर जिंकून ते रायगडावर जेव्हा आले, तेव्हा एक वीस वर्षांचा राजा लेझीम खेळलाही असेल. त्यात गैर काय, असं मला वाटतं. पण जर लोकांच्या आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर तो लेझीम हा प्रकार चित्रपटापेक्षा आणि महाराजांपेक्षा मोठा नाही. त्यामुळे आम्ही तो नक्की डिलिट करू.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;