Parliament Budget Session मोदी सरकारची अग्निपरीक्षा! संसदेचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

Parliament Budget Session मोदी सरकारची अग्निपरीक्षा! संसदेचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

चेंगराचेंगरीमुळे कुंभमेळय़ाच्या नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना केंद्राने घेतलेली बघ्याची भूमिका, शेतकरी आंदोलकांकडे होत असलेले दुर्लक्ष, दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काढलेले अनुद्गार, वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदी या मुद्दय़ांवर उद्यापासून सुरू होणारे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार आहे. आक्रमक विरोधकांमुळे हे अधिवेशन मोदी सरकारसाठी अग्निपरीक्षाच ठरेल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या विक्रमी आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडतील, मात्र या अर्थसंकल्पात देशातील सामान्यजनांना काही दिलासा मिळेल काय, याकडे देशाचे लक्ष लागलेले असेल. महिला अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांनी नावलौकिक मिळविला असला तरी देशातील माताभगिनी महागाईने हैराण असताना, निर्मलाताईंना महागाईवर काही रामबाण इलाज अजून तरी सापडलेला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन देशवासीयांना कोणता दिलासा देतील, याबाबत कयास मांडले जात आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय प्रघातानुसार आज सर्वपक्षीय बैठक झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 36 राजकीय पक्षांचे 52 नेते उपस्थित होते. या बैठकीत विरोधकांनी संसदेचे अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजीजू यांनीही हे अधिवेशन सुरळीत पार पडेल, असा विश्वास या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

बजेटमध्ये काय असेल…

मोदींचे सरकार नितीशबाबू व चंद्राबाबू यांच्या पांठिंब्यावर तगलेले आहे. यापैकी काही गडबड झाल्यास या वर्षी देशात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मध्यमवर्गाला खूश करण्यासाठी या अर्थसंकल्पाद्वारे काही पावले टाकली जातील, असे मानले जात आहे. इंधन तेलाच्या दरात कपात करून सरकार मध्यमवर्गाला दिलासा देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आयकराची मर्यादाही वाढवली जाऊ शकते. देशभरातील शेतकऱयांमध्ये सरकारविरोधात असलेली नाराजी व पंजाबमध्ये पेटलेले शेतकरी आंदोलन लक्षात घेऊन किसान सन्मान योजनेच्या रकमेत घसघशीत वाढ अपेक्षित आहे.

उद्या अर्थसंकल्प

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधन करतील. 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील. 3 फेब्रुवारीपासून लोकसभा व राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होईल. अर्थसंकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 व 7 फेब्रुवारीला उत्तर देतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीला संपेल. दुसरा टप्पा 10 मार्चपासून सुरू होईल तो 4 एप्रिलपर्यंत चालेल.

संतोष देशमुख हत्या, अदानींवर भूखंडांची खैरात, महाराष्ट्रातील खासदार जाब विचारणार

– सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहचले आहेत. विरोधकांबरोबर सत्ताधारी पक्षाचे आमदारही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र, त्यानंतरही कृषिमंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे.

– अदानी समूहाला मुंबई शहरातील मोक्याचे भूखंड कवडीमोल दराने देण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मिठागरांच्या जमिनीदेखील अदानीच्या घशात घातल्या जात आहेत. या मुद्दय़ावर महाविकास आघाडीचे खासदार आक्रमक होऊन सरकारला जाब विचारणार.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;