‘छावा’ चित्रपटाच्या वादाबाबत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले “हल्ली सगळ्यांनाच..”

‘छावा’ चित्रपटाच्या वादाबाबत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले “हल्ली सगळ्यांनाच..”

‘फक्त सेलिब्रेशनचं गाणं असेल तर त्यासाठी संपूर्ण चित्रपट कशाला पणाला लावता,’ असा सल्ला ‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना दिल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं. मुंबईतील वरळीत मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे ‘छावा’च्या ट्रेलरवरून सुरू असलेल्या वादावर मोकळेपणे व्यक्त झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतिक्षित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका दृश्यावरून विविध स्तरांतून आक्षेप घेण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणाी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करतानाचा हा प्रसंग होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

काय म्हणाले राज ठाकरे?

“छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट काढणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर परवा माझ्याकडे आले होते. ते उत्तम दिग्दर्शक आहेत. मी काही चित्रपटाचा डिस्ट्रिब्युटर नाही. पण महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे. कारण आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे आमची प्रेरणा आहेत, तर छत्रपती संभाजी महाराज हे आमचे बलिदान आहेत. मी त्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला नव्हता. अमेय खोपकरांनी मला सांगितलं होतं की दिग्दर्शकांना मला भेटायचं आहे. त्यानंतर मी ट्रेलर पाहिला. दुसऱ्या दिवशी ते मला भेटायला आले. अर्थात लेझीम हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे आणि संभाजीराजेंनी कधीतरी हातात लेझीम घेतलंही असेल, काय माहिती? इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल. मी त्यांना विचारलं की, त्या एका गाण्याने चित्रपट पुढे सरकतोय का? की नुसतं सेलिब्रेशनचं गाणं आहे? त्यावर ते म्हणाले की फक्त सेलिब्रेशनचं गाणं आहे. मग म्हटलं, त्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावताय?”, असं राज ठाकरे म्हणाले.

याविषयी ते पुढे म्हणाले, “आपल्याकडे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय, सगळेच इतिहासतज्ज्ञ झाले आहेत, सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतायत सगळ्याबाबतीत. पण म्हटलं जेव्हा लोक चित्रपट पाहायला जाणार तेव्हा औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत, ते डोक्यात ठेवून जेव्हा लोकं जातील आणि ट्रेलरमध्ये लेझीम वगैरे दिसत असेल तर म्हटलं काढून टाका ते. नंतर मी कोणाशी तरी बोलत होतो की, रिचर्ड ॲटनबरो.. ज्याने महात्मा गांधी चित्रपट केला. आपल्यासमोर महात्मा गांधींची काही आंदोलनं येतात. पण चित्रपट पाहायला गेल्यावर आपल्याला महात्मा गांधी दांडिया खेळताना दिसले, तर कसं वाटलं असतं? दिग्दर्शकांना तो सीन टाकायचाही असेल, पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्याने दांडिया खेळता नाही आला. ते जर दोन काठ्या घेऊन चालले असते, तर कदाचित आला असता सीन. माहित नाही आपल्याला.”

‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील लेझीमच्या प्रसंगावर संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्षेप घेतला होता. तसंच उदयनराजे भोसले यांनीही दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून इतिहासतज्ज्ञांना विचारात घेऊन संबंधित प्रसंगामध्ये आवश्यक बदल केल्यास वाद संपेल, असं सांगितलं होतं. त्यानंतर उतेकरांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर आणि राजकीय मंडळींसह अनेकांनी या प्रसंगाला घेतलेला आक्षेप विचारात घेऊन चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंद काढला जाणार असल्याचं उतेकर यांनी स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;