अखेर प्रतीक्षा संपली; बहीण भावाचं दिव्य, पवित्र नातं उलगडणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या तारखेला होणार प्रदर्शित
भक्त संप्रदायातील अगदी लहान वयात मान्यता पावलेली दैदीप्यमान शलाका म्हणजे संत मुक्ताबाई. बुद्धिमान, ज्ञानी अशा संतांना आपल्या प्रखर विद्वत्तेने आणि अधिकारवाणीने गुरुमंत्र देऊन ही शलाका तळपती झाली. अशा संत मुक्ताबाईंचं आणि त्यांच्या कुटुंबाचं प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 18 एप्रिलला ‘मुक्ताई’ थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए. ए. फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.
‘सप्रेम निवृत्ती आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलचरणी । – संत चोखामेळा. आदिमाया आदिशक्ती संत मुक्ताईला भेटूया 18 एप्रिल 2025 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात..’, अशा कॅप्शनसह नवीन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये संत ‘मुक्ताई’ विठूरायाची आराधना करताना दिसत आहे.
देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य आणि विचारांना जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मुक्ताई’ने निभावलेल्या माता, भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहेत. स्त्री-पुरुष भेदापलीकडे जगणं शिकविणाऱ्या संत मुक्ताईंचा खडतर आणि भक्तीरसाने परिपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा वेगळा प्रयत्न केल्याचं दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.
View this post on Instagram
A post shared by Sant Dnyaneshwaranchi Muktaai | संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई (@muktaaifilm)
या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचं आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचं आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचं आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिलं आहे. तर साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List