Sanjay Raut News – गोगावले आणि तटकरेंमध्ये गँगवॉर, संजय राऊत यांनी व्यक्त केली रक्तपाताची भिती
भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात जे सुरू आहे त्याला गँगवॉर म्हणतात असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच या गँगवॉरमध्ये रक्तपात होईल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी वेळीच लक्ष घातले पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत घेतेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आमदार अपात्रेसंदर्भात निर्णय येईल अशी अपेक्षा होती. संविधान आणि घटनेनुसार न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. आमदार ज्यांनी पक्षांतर केलं आहे ते अपात्र ठरतील. बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल. पण न्यायाच्या बाबतीत या अपेक्षा ठेवता येत नाहीत. आजच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सांगितले आहे की, या देशाचे सुप्रीम कोर्ट असेल किंवा हाय कोर्ट असेल हे सरकारच्या दबावाखाली आहे. मदन लोकूर यांनी अनेक वर्ष सुप्रीम कोर्टात आणि हाय कोर्टात न्यायाधीश पदावर काम केलं. ते म्हणाले की सुप्रीम कोर्टापासून आमची न्यायव्यवस्था ही सरकारच्या दबावाखाली आहे आणि त्यानुसार निर्णय घेतेय. अशा वेळेला जे माजी न्यायमूर्ती सांगत आहेत. लोकूर निवृत्त झाल्यावरच बोलत आहेत असे नाही. लोकूर जेव्हा पदावर होते तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेतली. चार न्यायमूर्तींनी मुख्य न्यायाधीशांविरोधात पत्रकार परिषद घेतली होती, त्यात मदन लोकूर होते. बेडरपणे त्यांनी काम केलं त्यांनीच सांगितलं की न्याय मिळत नाही. निकालासाठी दबाव टाकला जातो असं त्यांनी म्हटलं होतं. चंद्रचूड साहेब तीन वर्ष मैदानात जे खेळत राहिले, बॉल घासत राहिले आणि विकेट घेतलीच नाही असेही संजय राऊत म्हणाले.
वाल्मीक कराडप्रकरणी संजय राऊत म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी आंदोलन सुरुच होतं, लोक रस्त्यावर आले होते. सुरेश धस यांनी बीडमधील दहशतवादाविरोधात आंदोलन केलं होतं. या दहशतवादाविरोधात धस यांचं तांडव सुरू आहे. आणि या तांडवाला शासकीय आशिर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही. तरीही आज वाल्मीक कराड हे रुग्णालयात आहेत, त्यांचं काय दुखतंय हे माहित नाही. त्यांच्यासाठी रुग्णालयातला एक मजला रिकामा करण्यात आलेला आहे, इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत. हे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवारांना दिसत नाही का? हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, असं भाजपचे आमदार सुरेश धस सांगत आहेत. अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फारतर. त्यामुळे निर्णय काय होईल यात पडू नका. वाल्मीक कराड काही दिवसांनी राजकारणात येतील आणि भाजपच्याच गटामध्ये बसले असतील असेही संजय राऊत म्हणाले.
सुरेश धस हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे. सरकारने धस साहेबांचं ऐकलं पाहिजे. सुरेश धस हे बीडचे आमदार आहेत, त्यांना बीडची परिस्थिती माहित आहे. आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही.
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मी ओळखतो. आमचे मित्र होते ते. त्यांचं आणि आमचं फार गुळपीठ होतं एकेकाळी. एकनाथ शिंदे यांची रस्सी कधी जाळतील याकडे त्यांनी लक्ष द्यावं. तुम्ही भाजपसोबत आहात, तुम्ही आगीशी खेळताय. आम्ही वाचलोय, आमची रश्शी पुन्हा नव्याने वळू आणि त्याचा फासही करू. कुणाच्या गळ्यात टाकायची आहे ते टाकू. आम्ही स्वाभिमानाने बाहेर राहिलो. तुम्ही सगळे जे लाचारीच्या मार्गाने चाललेले आहात, त्याला स्वाभिमान म्हणत नाहीत. एकनाथ शिंदे यांनी इतिहासातले दाखले देऊ नये. आम्ही तुम्हालाही ओळखतो आणि तुमच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनाही ओळखतो. जे पळून गेले, डरपोकपणानं त्यांनी अशी भाषा करू नये असेही संजय राऊत म्हणाले.
भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात जे सुरू आहे त्याला मुंबईच्या भाषेत अंडरवर्ल्डचं गँगवॉर म्हणतात. हे गँगवॉर जर थांबलं नाही तर रायगडच्या रस्त्यावर रक्तपात होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी वेळीच या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे. फक्त फडणीवसच नाही तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनीही लक्ष घातलं पाहिजे. कारण या गँगवॉरमध्ये आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा सहभाग आहे. ही महाराष्ट्रासाठी चिंतेंची आणि गंभीर बाब आहे असेही संजय राऊत यांनी नमूद केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List