सिनेविश्व – 2024 चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या गोष्टी

सिनेविश्व – 2024 चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या गोष्टी

>> दिलीप ठाकूर

सतत काही तरी घडत बिघडत राहणे हे चित्रपटसृष्टीचे वैशिष्टय़. 2024 मध्येही असेच बरेच काही घडले. किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची ऑस्करसाठीची हिंदुस्थानची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड होताच ऑस्कर पुरस्काराबाबत वाढलेल्या अपेक्षा मात्र फोल ठरल्या. ऑस्करच्या विदेशी चित्रपट विभागात नामांकन प्राप्त करण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आणि पुन्हा एकदा आपल्या देशात हिंदी व मराठीसह तब्बल 35 लहान-मोठय़ा प्रादेशिक भाषेतील (तुळू, कोंकणी, छत्तीसगढी वगैरे) चित्रपट निर्मितीची संख्या वर्षभरात दीड हजारापर्यंत पोहोचली. मात्र ऑस्करच्या अंतिम फेरीत आपला चित्रपट स्थान प्राप्त करू शकत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

या स्पर्धेसाठी ‘लापता लेडीज’ चित्रपटाची निवड योग्य होती की नव्हती, यावरूनही वाद झाला. मात्र गुनीम मोंगा दिग्दर्शित ‘अनुजा’ या हिंदुस्थानी लघुपटाची 180 लघुपट प्रवेशिकांतून अंतिम फेरीत निवड झाली आहे. 17 जानेवारीला ऑस्कर अंतिम फेरीतील नामांकने जाहीर होतील त्यात ‘अनुजा’ या लघुपटाची निवड होईल असा विश्वास आहे. हिंदुस्थानातील वस्त्राsद्योगातील लहान मुलांच्या श्रमावर फोकस टाकत असलेल्या या लघुपटात नागेश भोसलेची भूमिका आहे हे विशेषच. ब्रिटिश हिंदुस्थानी दिग्दर्शिका संध्या यांच्या ‘संतोष’ या चित्रपटाला ऑस्करच्या विदेशी चित्रपट नामांकनात मिळालेले स्थान आपल्या देशातील चित्रपट रसिकांना विशेष सुखावणारे आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या देशातील विविध भाषांतील चित्रपटांचा प्रभाव जाणवला. 77 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाला ग्रॅन्ड प्रिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा चित्रपट मल्याळम, हिंदी व आवश्यक तेथे मराठीत आहे. या चित्रपटातील छाया कदमच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. रेड कार्पेटवरील छाया कदमची उपस्थिती तिला प्रसिद्धीझोतात आणणारी ठरली. महाराष्ट्रीय कलाकाराची ही झेप कौतुकास्पद.

नवी दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जागरण चित्रपट महोत्सवात ‘मंथन’ (1976) या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात आला आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा वयाच्या नव्वदीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. या वर्षी आपल्या देशातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जात असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी मिथुन चक्रवर्तीची झालेली निवड अनेकांना आश्चर्यकारक वाटली. मृणाल सेन दिग्दर्शित ‘मृगया’ (1976) हा पहिला चित्रपट वगळता मिथुन चक्रवर्तीने कायमच मसालेदार व मनोरंजक चित्रपटातून काम केले.

व्यावसायिक यशावर फोकस टाकताना असे दिसते की सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा-2’ साठी मुंबई व दिल्लीतील मल्टिप्लेक्समध्ये रात्रीच्या खेळासाठी दोन तर कुठे दोन हजार चारशे रुपये तिकीट दर असूनही रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘पुष्पा-2’ने उत्पन्नाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. पण हे यश काही वेगळे प्रयोग करणाऱया दिग्दर्शकांसाठी मारक ठरेल काय? हैदराबाद येथील संध्या चित्रपटगृहातील प्रीमियरसाठी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला एक दिवसासाठी गजाआड जावे लागले. यावरून बरीच उलटसुलट प्रतिक्रिया उमटली. क्रिकेट स्टेडियममधील चेंगराचेंगरीत एखाद्या प्रेक्षकाचे निधन झाले तर खेळाडूला दोष देणार का? असाही रोखठोक प्रश्न केला गेला. याच चेंगराचेंगरीत सापडलेल्या मुलालाही ब्रेन डेड या आजाराला सामोरे जावे लागले. कलाकारांवरील प्रेमाचा हा अतिरेक चिंताजनक बाब.

राज कपूरच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभरातील 40 लहान-मोठय़ा शहरांत आयोजित केलेल्या राज कपूरच्या चित्रपट महोत्सवाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यात ‘आग’, ‘बरसात’, ‘आवारा’, ‘जिस देश मे गंगा बहती है’, ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘राम तेरी गंगा मैली’ इत्यादी चित्रपटांचा समावेश होता. जॉन मॅथ्यूज दिग्दर्शित ‘सरफरोश’ (1999) या चित्रपटाच्या प्रदर्शनास 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेला सोहळा उल्लेखनीय.

सलमान खानच्या घरावर सकाळी झालेला गोळीबारची घटना, काही वर्षांपूर्वीचे अनेक चित्रपट पुन्हा एकदा अर्थात रिपीट रनला प्रदर्शित करण्याचा ट्रेण्ड चर्चेचा ठरला. अशा पद्धतीने जुने चित्रपट मॅटिनी शो, रिपीट रनला प्रदर्शित करणे हे 60 व 70 च्या दशकातील कल्चर. त्या काळात मॅटिनी शोला विशेष ग्लॅमर होते. मल्टिप्लेक्स युगात ते हरवले आहे. पूनम पांडेची सवंग प्रसिद्धीसाठी स्वतच्याच मृत्यूची बातमी गाजली. त्यात तिचे हसे झाले. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या यांच्या घटस्फोटावर सतत उलटसुलट बातम्या येत राहिल्या. मराठी चित्रपटांचे काही शहरांतून आणि नाटय़गृहातून खेळांचे आयोजन करण्यात आले होते. अशा अनेक लहान-मोठय़ा गोष्टींनी 2024 वर्ष सरले.

[email protected]
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;