भटकंती – देशोदेशीचा ख्रिसमस

भटकंती – देशोदेशीचा ख्रिसमस

>> निमिष पाटगावकर

वर्षाची सांगता होणारा हा सण सरत्या वर्षातील भल्याबुऱया घटनांना पाठीशी घालून नव्या वर्षाचे स्वागत करायची नवी उमेद जागवतो. हा सण सर्व कुटुंबाला एकत्र आणतो. सर्व जगात सुख, समाधान, आरोग्य आणि शांती मागणारे पत्र लिहायची वेळ आज आली आहे. सर्व मागण्या पूर्ण करणारा सांताक्लॉज ही मागणीही पुरी करेल या भाबडय़ा आशेवर आपण ख्रिसमस साजरा करत नववर्षाला सामोरे जाऊया.

आजवर मला जगात अनेक शहरांत ख्रिसमस साजरा करायचे भाग्य लाभले आहे. परदेशात ख्रिसमसचा उत्साह शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात बघायला मिळतो. अमेरिकेतल्या उत्तरेकडच्या राज्यात ख्रिसमसचे आगमन होईपर्यंत हिमवर्षावाची सृष्टीवर पांढरीशुभ्र दुलई अंथरलेली असते. ख्रिसमस जरी 25 डिसेंबरला असला तरी त्याचे वेध महिनाभर आधीपासूनच चालू होतात. नोव्हेंबरच्या शेवटच्या गुरुवारी थँक्स गिव्हिंग झाले की, ख्रिसमसच्या उत्सवी वातावरणाची नांदी चालू होते. अवाढव्य मॉल्स रोषणाईने उजळले जातात. अनेक प्रकारच्या सजावटीने ख्रिसमस ट्री लगडलेले असते.

न्यूयॉर्कच्या रॉक फेलर सेंटरचे ख्रिसमस ट्री बघणे हा एक इव्हेन्ट असतो. गेली 80 वर्षे हा सोहळा इथे चालू आहे. जगाला पर्यावरणाचे धडे देणाऱया अमेरिकेत मात्र ख्रिसमस ट्रीसाठी प्रचंड वृक्षतोड होते. यंदाचे रॉक फेलर सेंटरची ट्री हे सत्तर वर्षे जुने झाड आहे जे मॅसेच्युसेट्स राज्यातून तोडून आणले आहे. यंदाचे झाड 7 नोव्हेंबरला कापले आणि 9 नोव्हेंबरला न्यूयॉर्कला आणले गेले. हे इतके मोठे झाड सजवायला पन्नास हजार रंगीबेरंगी दिवे आणि आठ किलोमीटर लांबीची तार लागली. त्याच्यावर लावलेला स्टार तब्बल 408 किलोंच्या स्वरोवस्की क्रिस्टलचा आहे. ज्याला 70 पैलू आहेत आणि त्यावर तीस लाख खडे बसवलेले आहेत. या अवाढव्य ट्रीचे सत्तर वर्षांचे नैसर्गिक आयुष्य जगल्यावर जानेवारीच्या मध्यापर्यंत हे कृत्रिम आयुष्य असते.

अमेरिकेतील सर्व भव्यदिव्य अशा ख्रिसमसच्या वातावरणातून जेव्हा मी युरोपमधला ख्रिसमस बघितला तेव्हा सौंदर्याची एक वेगळीच छटा बघायला मिळाली. युरोपमध्ये अमेरिकेची भव्यदिव्यता नसली तरी छोटे रस्ते व गल्लीबोळ ख्रिसमसच्या सजावटीने सुरेख नटलेले असतात. जर्मनीतल्या म्युनिकचा प्रख्यात मारीअनप्लाट्झ ख्रिसमसच्या सजावटीने नखशिखांत सजतो. ख्रिसमसच्या एक-दोन आठवडे आधीपासूनच मोठमोठय़ा दुकानांच्या दर्शनी भागात येशू ख्रिस्त जन्मकहाणी सांगणाऱया क्रिब्स सजवलेल्या असतात. म्युनिकहून काही तासांवर असलेल्या न्यूरेंबर्गमध्ये सोळाव्या शतकापासून भरणारे ख्रिसमस मार्केट तर बघण्यासारखे असते. इथे ख्रिसमसला लागणारी सामग्री आणि त्याचबरोबर जिंजर ब्रेड आणि बदामाच्या बिस्किटांचा मंद सुवास दरवळत असतो.

लंडनचा ऑक्सफर्ड स्ट्रीट बघणे ही ख्रिसमस काळातील पर्वणी असते. एका टोकाला सेल्फ रिजेससारखी अवाढव्य सजलेली दुकाने तर दुसऱया टोकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सुंदर रोषणाई असते. या रोषणाईत लंडनच्या लालचुटुक डबलडेकर बस, काळय़ा टॅक्सी आणि विविधरंगी हिवाळ्याच्या कपडय़ात लपेटलेले लोक… चित्रकाराला खुणावणारे हे दृश्य असते.

रोमच्या व्हॅटिकन सिटीमध्ये भव्य सिस्टीन चॅपल, सेंट मार्था चॅपल किंवा सेंट पीटर्स बॅसिलिका… इथे गेले की, तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात हे सर्व विसरून फक्त नतमस्तक व्हावेसे वाटते. या सर्वांच्या मध्यभागी एका मनोऱयावर एक लुकलुकता तारा सर्व जगाला आशेचा किरण दाखवत असतो. ख्रिसमसच्या दिवशी पोप यांचे भाषण ऐकायला जमलेल्या लाखाहून अधिक समुदायाच्या डोळ्यात फक्त कृतकृत्य झाल्याचे भाव असतात.

युरोप असो वा अमेरिका, एक समान गोष्ट म्हणजे 24 डिसेंबरपर्यंत असलेली ही धामधूम ख्रिसमसच्या दिवशी मात्र शांत असते. कारण हा सण कुटुंबियांवर साजरा करण्याचा आहे. चर्चमधील मध्यरात्रीची प्रार्थना झाली की, सार्वजनिक उत्सवातून हा सण घरगुती वातावरणात येतो. ख्रिसमस लंच, उंची वाईन, केक यांनी टेबल सजतात आणि ख्रिसमस ट्रीच्या खाली ठेवलेल्या भेटवस्तू उघडताना प्रत्येकाच्या चेहऱयावर उत्सुकता ओसंडून वाहत असते. याच कारणामुळे युरोप आणि अमेरिकेतील सर्व दुकाने, कार्यालये इतकेच काय तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही या दिवशी पूर्ण बंद असते. जेणेकरून सर्वांना आपल्या कुटुंबीयांबरोबर हा सण साजरा करता यावा.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;