नवी मुंबईतील पोलिसांनी घरी बसून घेतला पगार, ऑनड्युटी केवळ कागदावर; तक्रारीनंतर रजेच्या अर्जासाठी धावपळ
नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील सुमारे 125 पोलिसांनी घरी बसून पगार घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पेण तालुक्यातील अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी तक्रार केल्यानंतर मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून या व्हीआयपी कर्मचाऱ्यांकडून रजेचा अर्ज भरण्यासाठी धावपळ करण्यात येत आहे.
एखाद्या ठिकाणी दंगल किंवा विशेष घटना घडल्यास तसेच व्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्याला संरक्षण देण्याकरिता आणीबाणीच्या वेळी वापरता यावे असे मनुष्यबळ पोलीस मुख्यालयात असते. मात्र काही कर्मचारी पैसे देऊन कामावर न जाता केवळ कागदावर ड्युटी करतात. ड्युटीच्या वेळेत प्रत्यक्षात मात्र ते घरी असतात किंवा या वेळेत खासगी कामे करीत असतात. यासंदर्भात अॅड. ठाकूर यांनी तक्रार करताच घरी बसून पगार घेणाऱ्या या पोलिसांनी तातडीने रजेचे अर्ज केले व ते रजेचे अर्ज पोलीस निरीक्षकांनी तत्परतेने मंजूर करून त्यांना रजेवर सोडले आहे. यापूर्वी 11 महिने रजा न घेणारे अचानक 16 डिसेंबरपासून रजेवर गेले आहेत.
64 कर्मचारी रजेवर
नवी मुंबई पोलीस मुख्यालयात सहा कंपन्या आहेत. सर्वात जास्त संख्या प्रोटेक्शन कंपनीमध्ये आहे. 17 डिसेंबर रोजी 37 अंमलदार रजेवर आणि स्मार्ट ड्युटी प्रोटेक्शन कंपनीमधील 27 अंमलदार कर्मचाऱ्यांचीही रजा मंजूर करण्यात आली आहे. एकाच दिवशी 64 पोलीस कर्मचारी रजेवर गेले आहेत. याप्रकरणी प्रोटेक्शन कंपनी जनरल ड्युटी अंमलदार व राखीव पोलीस निरीक्षक यांच्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशी मागणीही ठाकूर यांनी केली आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List