‘झाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच…’; राज ठाकरेंनी झाकीर हुसेन यांना वाहिली श्रद्धांजली

‘झाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच…’; राज ठाकरेंनी झाकीर हुसेन यांना वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी हृदयाशी संबंधित आजारामुळे निधन झालं. सॅन फ्रॅन्सिस्कोमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर जगभरातील चाहते शोक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा त्यांच्यासाठी विशेष पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे. ‘उस्तादजी जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल,’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या आहेत. झाकीर यांना त्यांच्या वडिलांकडूनच तबल्याचं बाळकडू मिळालं होतं. वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली होती. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्यांनी भारतातील सर्वश्रेष्ठ संगीतकार, नर्तकांबरोबर आंतरराष्ट्रीय दौरे केले आणि त्यांना मोठं यशही मिळालं.

राज ठाकरेंची पोस्ट

‘जगप्रसिद्द तबला वादक, पद्मविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांचं दुःखद निधन झालं. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एका लयीत सुरु असते, मग तो श्वास असू दे की वाहणारा वारा असू दे की फुलणारी फुलं असू देत, या प्रत्येकातील लय अगदी मोजक्या लोकांना जाणवते, अनुभवता येते, आणि अशी माणसं अतिशय लयबद्ध असतात, तालबद्ध असतात, आणि ती त्यांच्या क्षेत्रातील योगी पुरुष ठरतात. उस्ताद झाकीर हुसैन हे तबल्यातील ‘तालयोगी’ होते असं मला नेहमी वाटत राहिलं.

असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे वडील अल्लाह रखा खान साहेबांनी, जाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या कानात हळूच तबल्याचे बोल सांगितले. असलं जबरदस्त बाळकडू किती जणांच्या वाट्याला येतं मला माहित नाही, आणि जरी आलं तरी ते पेलवावं झाकीरजींनीच.

वयाच्या १२ व्या वर्षापासूनच ते वडिलांच्या सोबत मैफिलीत साथीला बसू लागले. तो काळ असा होता की पंडित रविशंकर यांच्यामुळे भारतीय वाद्यसंगीताबद्दल जागतिक पातळीवर प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं, आणि जगभरातील नामांकित वादक, भारतीय वाद्यसंगीताच्यासोबत विविध प्रयोग करायला उत्सुक होतं. एका अर्थाने भारतीय संगीत जागतिकरणाच्या युगात शिरत होतं, अशावेळेला झाकीर हुसैन यांनी, ‘शक्ती’ बँडची स्थापना केली, आणि भारतीय संगीताची शक्ती जगाला अधिकच जाणवू लागली.

प्रत्येक वाद्य त्या वादकाला काहीतरी सांगत असतं, आणि ते ऐकू येणं आणि त्याला वादकाने प्रतिसाद देणं ही क्रिया निरंतर सुरु असते. अशी निरंतर पण खूप खोल प्रक्रिया उस्तादजी आणि तबल्यात जवळपास ७३ वर्ष सुरु होती. जी आज थांबली. उस्तादजी जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल. उस्ताद झाकीर हुसैन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. 

झाकीर हुसेन यांच्यावर गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. झाकीर हुसेन हे अमेरिकेत स्थायिक होते. त्यांना रक्तदाबाची समस्या असल्याचं त्यांच्या मॅनेजर निर्मला बचानी यांनी सांगितलं. केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली संगीतकारांमध्ये झाकीर यांची गणना होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;