वा रे, भाजपचे हिंदुत्व! 80 वर्षांपूर्वी हमालांनी स्थापन केलेल्या दादर येथील हनुमान मंदिरावर भाजप सरकारचा बुलडोझर
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दादर पूर्व रेल्वे स्थानकालगतचे श्री हनुमान मंदिरावर बुलडोझर चालवण्याचे फर्मान भाजप सरकारने काढले आहे. यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मध्य रेल्वेने मंदिराच्या विश्वस्तांना नोटीस बजावली आहे. हमालांनी 80 वर्षांपूर्वी हे मंदिर स्थापन केले आहे. त्याची नोंदणीही झालेली आहे. तरीही हे मंदिर बेकायदा ठरवून पाडण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. यामुळे भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून वा रे, भाजपचे हिंदुत्व! अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महत्त्वाचे आणि मुंबईतील मध्यवर्ती असलेले दादर स्थानक रात्रंदिवस गजबजलेले असते. यामध्ये मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्र. 12 जवळ आरपीएफ ऑफिसजवळच हे हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी तब्बल सुमारे आठ दशकांपूर्वी गोरगरीब हमालांनी एकत्र येत या ठिकाणी मोठय़ा श्रद्धेने श्री हनुमान मंदिराची स्थापना केली. याच ठिकाणी साई बाबांचेही छोटे मंदिर आहे. त्यामुळे अगदी भल्या पहाटेपासून दादर स्थानकावर येणारे प्रवासी अगदी मनोभावे हनुमानाचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला जातात. मात्र हे मंदिर तब्बल 80 वर्षे झाल्यानंतर आता बेकायदा ठरवत पाडण्याचे आदेश मध्य रेल्वेच्या कार्यकारी सहायक मंडल इंजिनीयर यांनी बजावल्याने प्रवासी आणि भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे. या नोटीसीविरोधात चार दिवसांपूर्वी काही भाविकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनही केले.
मंदिराचा इतिहास
80 वर्षांपूर्वी येथील वृक्षाजवळ श्री हनुमानाची पुरातन मूर्ती सापडली. या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आली. शिवाय मंदिरात सुबक मारुतीच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापनाही करण्यात आली. या तत्कालीन वृक्षाचे खोडही विश्वस्तांनी जपून ठेवले आहे. हमालांनी या मंदिराची स्थापना केली, असे विश्वस्तांनी सांगितले.
मध्य रेल्वे प्रशासनाची देऊळ हटवण्यासाठी नोटीस
रेल्वे प्रशासनाने हनुमान मंदिर विश्वस्तांना नोटीस बजावून सदरचे बांधकाम रेल्वे हद्दीत असून बेकायदा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे मंदिर नोटीस मिळाल्याच्या सात दिवसांत पाडावे, अन्यथा रेल्वेकडून हे बांधकाम हटवण्यास येईल आणि याचा खर्चही तुमच्याकडून वसूल करण्यात येईल, अशी मुजोरीची भाषा वापरून नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे या मंदिराची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात 1969 मध्ये सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून झाली आहे.
हिंमत असेल तर मंदिराला हात लावून दाखवा!
दादर पूर्व येथे स्टेशनला लागून असलेले हनुमान मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दादर स्टेशनवर दररोज लाखोंच्या संख्येने येणारे भाविक या ठिकाणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढचा प्रवास करीत नाहीत. त्यामुळे हे मंदिर पाडण्याचा करंटेपणा रेल्वेने केला तर याची शिक्षा त्यांना आपोआपच मिळेल आणि याचे गंभीर परिणामही त्यांना भोगावे लागतील. देवच त्यांना शिक्षा देईल, असे सांगत मंदिराला हात तर लावून दाखवा असा इशाराच विश्वस्त प्रकाश कारखानीस यांनी दिला. त्यामुळे आम्ही नोटिसीविरोधात कोर्टात जाणार नाही. शिवाय कोणत्याही प्रकारचे आंदोलनही करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विकासाच्या नावा- खाली सरकार लाखो भाविकांच्या भावना पायदळी तुडवून डेव्हलपमेंट करीत असेल तर तो विकास नाही तर भकास ठरेल. एकीकडे राम मंदिर बांधल्याचा अभिमान दाखवायचा आणि दुसरीकडे प्रभू रामाच्या परमभक्ताचे मंदिर तोडता? हा प्रकार भाविकांच्या मनाला ठेच पोहोचवणारा आहे. – प्रकाश कारखानीस, विश्वस्त
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List