कुर्ल्यात भरधाव ‘बेस्ट’ बसने वीस जणांना चिरडले, तीन जणांचा मृत्यू; 17 गंभीर जखमी
बेस्टच्या भरधाव गाडीने कुर्ल्यात 20 जणांना चिरडल्याची दुर्घटना रात्री उशिरा घडली आहे. या भयंकर दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे बसने 20 जणांना अक्षरशः चिरडले. या दुर्घटनेत 17 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या पालिकेच्या भाभा आणि शीव रुग्णालयात करण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, अपघातानंतर बस चालकाने बस सोडून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.
बेस्ट उपक्रमाची कुर्ला ते अंधेरी या मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक 332 या भाडे तत्वावरील बसच्या चालकाचे रात्री 9.30 वाजताच्या सुमारास कुर्ला ( पश्चिम), आंबेडकर नगर, बुद्ध कॉलनी, महापालिका एल वार्ड कार्यालय, एस जी बर्वे मार्ग, अंजुमन ए इस्लाम शाळेसमोर एका रिक्षाला आणि आणखीन काही वाहनांना, पादचारी यांना जोरदार धडक दिली. बसचा ब्रेक फेल झाल्याने सदर दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते. मात्र अचानकपणे घडलेल्या या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. रिक्षातील प्रवासी, रिक्षा चालक आणि काही पादचारी असे किमान २० जण गंभीर जखमी झाले. या सर्व जखमींना तातडीने तेथील नागरिकांनी नजीकच्या भाभा आणि सायन रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. मात्र त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List