अजिंक्यच्या झंझावातामुळे मुंबईची उपांत्यपूर्व फेरीत मजल, आता मुंबईची गाठ विदर्भाशी पडणार
आंध्रच्या 230 धावांच्या जबरदस्त आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेच्या 54 चेंडूंतील 95 धावा आणि सूर्यांश शेगडेच्या 8 चेंडूंतील 30 धावांच्या झंझावाती खेळीने मुंबईला 3 विकेटनी विजयच मिळवून दिला नाही तर सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतही स्थान मिळवून दिले. गटात अव्वल असलेल्या पाचही संघांसह सौराष्ट्रने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले असून बंगाल-चंदिगड आणि आंध्र-उत्तर प्रदेशने यांच्यात उपउपांत्यपूर्वची लढत होईल आणि विजयी संघ उपांत्यपूर्व फेरीत धडक मारतील.
‘इ’ गटात तिसऱया क्रमांकावर असलेल्या मुंबईला विजयाशिवाय पर्यायच नव्हता. गटात आंध्र अव्वल होता, पण मुंबईने त्यांनाच नमवत गटात अव्वल स्थान संपादले. नेट रनरेटमध्ये मुंबईपेक्षा आंध्र सरस होता, पण आजच्या विजयामुळे मुंबईने आंध्रवर मात केली. आता मुंबई ‘ड’ गटात अव्वल असलेल्या विदर्भशी भिडेल. आंध्रने श्रीकर भरतच्या 53 चेंडूंतील 93, अश्विन हेब्बरच्या 52 आणि रिकी भुईच्या 68 धावांच्या फटकेबाजीमुळे 4 बाद 229 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ (34) आणि श्रेयस अय्यरने (25) अजिंक्यला साथ देत मुंबईला दहा षटकांत 126 पर्यंत नेले. सूर्यकुमार यादव (4) अपयशी ठरल्यानंतर रहाणेने शिवम दुबेबरोबरही 54 धावांची भागी केली, पण दुबे बाद होताच अजिंक्यचेही शतक 5 धावांनी हुकले. पुढे शम्स मुलानीही बाद झाला. 2 धावांत 3 विकेट गेल्याने मुंबई अडचणीत आली होती. पण तेव्हा सूर्यांश हेगडेने 8 चेंडूंत 3 षटकार 2 चौकार खेचत मुंबईला 3 चेंडू आधीच विजय मिळवून दिला.
अभिषेक शर्माचेही 28 चेंडूंत शतक
गेल्याच आठवडय़ात उर्विल पटेलने 28 चेंडूंत शतक झळकावले होते, तर आज त्याची पुनरावृत्ती अभिषेक शर्माने केली. मेघालयाच्या 143 धावांचा पाठलाग करताना अभिषेकने 29 चेंडूंत 8 चौकार आणि 11 षटकारांचा वर्षाव करत 106 धावा ठोकल्या आणि पंजाबला 9.3 षटकांत विजयी लक्ष्य गाठून दिले.
सय्यद मुश्ताक अली करंडकाची बाद फेरी
उपउपांत्यपूर्वचे सामने
9 डिसेंबर – 1. बंगाल वि. चंदिगड
9 डिसेंबर- 2. आंध्र वि. उत्तर प्रदेश
उपउपांत्य फेरीचे सामने
11 डिसेंबर- बडोदा वि. 1 नंबरचा विजेता
11 डिसेंबर- दिल्ली वि. 2 नंबरचा विजेता
11 डिसेंबर – मध्य प्रदेश वि. सौराष्ट्र
11 डिसेंबर- मुंबई वि. विदर्भ
बडोद्याचा विश्वविक्रमांचा पाऊस
बडोद्याने आज दुबळय़ा सिक्कीमच्या गोलंदाजीला फोडून काढताना पाच विश्वविक्रमांचा पाऊस पाडला. त्यांनी पुरूषांच्या टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावांचा विश्वविक्रम मोडीत काढताना 5 बाद 349 धावा ठोकल्या. याआधी झिम्बाब्वेने गाम्बियाविरुद्ध 4 बाद 344 धावा केल्या होत्या. आज बडोद्याच्या फलंदाजांनी 37 षटकारांची आतषबाजी करत झिम्बाब्वेचाच 27 षटकारांचा विक्रमही मोडीत काढला. भानु पनियाने 51 चेंडूंत नाबाद 134 धावा करताना 15 षटकार आणि 5 चौकार ठोकले. बडोद्याने सिक्कीमला 7 बाद 86 धावांवर रोखत हा सामना 263 अशा विक्रमी धावांनी जिंकला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List