काळे जॅकेट घालून इंडिया आघाडीची निदर्शने, ‘मोदी–अदानी एक है’च्या घोषणांनी दणाणून सोडला संसद परिसर
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज काळे जॅकेट घालून संसद परिसरात एंट्री घेतली. या जॅकेटवर मोदी अदानी एक है आणि अदानी सेफ है असे लिहिलेले स्टिकर्स लावण्यात आले होते. शाळा पहा अदानी, रस्ते पहा अदानी, वर पहा अदानी, खाली पहा अदानी अशा घोषणा खासदारांनी दिल्या. अदानी लाचखोरी प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा आणि सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी करणारे फलक घेऊन सर्व खासदारांनी संसद भवनाच्या पायऱ्यांपर्यंत अक्षरशः लॉन्ग मार्च काढला. त्यानंतर मकर दरवाजासमोर एकत्र येऊन सरकारविरोधात पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढे आणि विरोधी पक्षांतील खासदार मागे अशा पद्धतीने मार्च काढण्यात आला. यादरम्यान, अदानी आणि मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अमेरिकेतील कोर्टाने म्हटले आहे, हिंदुस्थानात भ्रष्टाचार झाला आहे. परंतु इथे सरकार संसदेत चर्चा करायला तयार नाही. अदानी यांचे नाव घेतले की, आमचे तोंड बंद केले जाते. त्यामुळे आमचा विरोध कायम राहील आणि तो वाढतच राहील, असे काँग्रेसचे महासचिव आणि खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले. दरम्यान, या आंदोलनात राष्ट्रीय जनता दल, डाव्या पक्षांसह विविध विरोधी पक्ष सहभागी झाले होते.
संसद भवनासमोर आंदोलनास मनाई
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मकर दरवाजाजवळ संसदेच्या पाय्रयांवर मोदी सरकारविरोधात अदानी लाचखोरी, संभल आणि मणिपूर हिंसाचारावरून घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहात आलेल्या आंदोलनकर्त्यांना पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अशाप्रकारे स्टीकर्स लावून सभागृहात येऊ नये त्याचबरोबर संसद भवनासमोर आंदोलन करू नये असे सांगितले. याप्रकरणी लोकसभा सचिवालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली.
मोदींना मणिपूरप्रमाणे संभलही पेटवायचेय –गोगोई
भाजपा प्रत्येक गोष्टीत खोटे बोलत आहे. त्यांना संसदेचे अधिवेशन चालवायचेच नाही. राहुल गांधी देशात शांतता कायम राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याप्रकारे मणिपूर पेटवले त्याचप्रकारे त्यांना संभलमध्येही आग लावायची आहे, असा आरोप आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी केला. दरम्यान, यावेळी ‘गली गली में शोर है, मोदी-अदानी चोर है’ च्या घोषणा विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्या.
अदानींची चौकशी झाली तर मोदींची चौकशी होईल – राहुल गांधी
अदानी लाचखोरीबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता तुम्ही स्वतःची चौकशी कराल का? असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. जर मोदींनी अदानींची चौकशी सुरू केली तर त्यांची चौकशी सुरू होईल. त्यामुळे ते अदानी लाचखोरीप्रकरणी चौकशी करत नाहीत असे राहुल गांधी म्हणाले. मोदी आणि अदानी एकच आहेत असेही ते शेवटी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List