शपथविधीमुळे बेस्ट प्रवाशांचे हाल; शेकडो स्टॉपवर गर्दी, लांबच लांब रांगा, उन्हात घामटा
राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या शपथविधीसाठी आझाद मैदानात लोकांना येण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून ‘बेस्ट’च्या तब्बल 582 गाडय़ा सोडल्याने नियमित प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले. अनेक बेस्ट बस स्टॉपवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यातच मुंबईत प्रचंड ऊन आणि उकाडय़ामुळे प्रवाशांचे हाल झाले.
आझाद मैदानावरील शपथविधी सोहळय़ाला गर्दी जमवण्यासाठी तिन्ही पक्षांकडून शेकडो गाडय़ा सोडण्यात आल्या. मात्र यासाठी बेस्टच्या गाडय़ाही घेण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या एकूण 3,175 बसेस आहेत. यापैकी काही बसेस नादुरुस्त असल्याने प्रवासी सेवेत धावत नाहीत. त्यात गुरुवारी शपथविधी सोहळय़ासाठी 582 बसेस आरक्षित केल्याने कामावर जाण्याच्या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. बेस्टला आज 75 लाखांचा महसूल मिळाला असला तरी प्रवाशांचे हाल झाले. याला जबाबदार कोण, असा सवाल केला जात आहे.
प्रवाशांच्या गैरसोयीला जबाबदार कोण?
बेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या 3175 गाडय़ांमधील बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या केवळ 1003 गाडय़ा आहेत, तर 2172 गाडय़ा भाडेतत्त्वावरील आहेत. यामध्ये स्वतःच्या ताफ्यातील 500 गाडय़ा पुढील वर्षी कालबाह्य होणार आहेत. त्यामुळे आधीच गाडय़ांची संख्या कमी होत असताना 35 लाखांवर प्रवाशांसाठी आज केवळ 2575 बस उपलब्ध होत्या. त्यामुळे प्रवाशांचे नाहक हाल झाल्याचे ‘बेस्ट’ कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List