धक्कादायक! दिव्यात ‘बदलापूर’, शाळेत घुसून विकृताचे चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे
बदलापूरच्या शाळेत सफाई कामगाराने दोन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याच्या घटनेस जेमतेम तीन महिने उलटत नाहीत तोच दिव्यातही असेच ‘बदलापूर’ घडले आहे. दिव्याच्या बेकायदा स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश हायस्कूलमध्ये पाचवीत शिकत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत मंगळवारी एका विकृताने अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या विकृताने थेट शाळेत घुसून वर्गातच त्या विद्यार्थिनीला एकटे गाठले व तिच्याशी जवळीक साधत विकृत चाळे करून तो पसार झाला. त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या अनपेक्षित प्रकारामुळे पाचवीतील चिमुकली प्रचंड घाबरली असून ती तणावाखाली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र शाळा प्रशासनाने पोलिसांना अर्धवट फुटेज दिले असून विद्यार्थिनीवरही दबाव टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान विनयभंग करणाऱ्याला त्वरित अटक करा, अशी मागणी पालकांनी केली आहे.
बदलापूरमधील शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हजारो संतप्त नागरिकांनी रेल्वे स्थानकात ट्रॅकवर उतरून जोरदार आंदोलन केले होते. त्याचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात उमटले. या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे मुंब्यात एन्काऊंटर करण्यात आले. त्याच मुंब्याच्या शेजारी असलेल्या दिव्यातील शाळेत पुन्हा विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याचे कृत्य उघडकीस आले आहे. दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी येथील स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश हायस्कूल असून या शाळेला मान्यता नाही. तरीदेखील या प्राथमिक शाळेत विद्यार्थी शिकतात. या घटनेमुळे संपूर्ण दिवा हादरून गेले आहे. विद्यार्थी व पालकही धास्तावले असून अशा विकृतांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मै मेरे बच्चे को छोडने आया था!
स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश हायस्कूलमध्ये पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीचे वडील हे फर्निचरचे काम करतात. तर आई गृहिणी आहे. ती मुलगी मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास शाळेत गेली. वडिलांनी गेटजवळ तिला सोडले. लवकर पोहोचल्याने वर्गात कुणीच नव्हते. हीच संधी साधून एक अज्ञात विकृत इसम आतमध्ये आला व तू कितवीत आहेस, असे त्याने विचारले. तिच्याशी त्याने लगट सुरू केली आणि अश्लील चाळे केले. या प्रकारामुळे ती कमालीची घाबरली आणि तिने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर तो विकृत पळून जाऊ लागला. मात्र जातानादेखील पुन्हा अश्लील कृत्य करून तो पळाला. आरडाओरडा ऐकताच शाळेतील शिक्षिका धावत आली व पळून जात असलेल्या त्या अनोळखी इसमाला रोखले. त्यावर तो म्हणाला, मै मेरे बच्चे को स्कूल मे छोडने आया था। असे सांगून त्याने धूम ठोकली.
मुख्याध्यापिका ताब्यात
शिक्षिकेने हा सारा प्रकार मुख्याध्यापिका संगीता तिवारी यांना सांगितला. त्यांनी ही घटना शाळेच्या संचालकांना व पोलिसांना कळवणे अपेक्षित होते. मात्र असे न करता दुपारच्या सुमारास एका महिला कर्मचाऱ्यासोबत त्या पीडित विद्यार्थिनीला घरी सोडले. तसेच कोणाला काही सांगू नको, असा दबावही टाकला. या हलगर्जीपणामुळे आज मुख्याध्यापिका तिवारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा कायमस्वरुपी बंद केली आहे.
…आणि घटना उघडकीस आली
दुपारच्या सुमारास मुलगी घरी पोहोचली तेव्हा तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. शाळेतील एका पालकाने पीडितेच्या आईला फोन करून तुम्हाला वर्गात काय घडले हे समजले आहे का, याबाबत विचारले. त्यानंतर आईने लगेच फोन करून मुलीकडून घडलेल्या प्रकाराची माहिती करून घेतली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाणे गाठले. आज याप्रकरणी अज्ञात विकृताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिवसैनिकांनी घेतली धाव
ही घटना कळताच दिव्यातील शिवसैनिकांनी शाळेकडे धाव घेतली. अनधिकृत शाळेवर कठोर कारवाई करून शाळेला टाळे ठोकावे अशी मागणी शहरप्रमुख सचिन पाटील यांनी केली. सोबत शहर समन्वयक प्रियांका सावंत, उपशहर संघटक स्मिता जाधव, विभागप्रमुख राजेश भोईर, शाखा संघटक पूजा आग्रहरी, उपशाखाप्रमुख संतोष कदम, शिवसैनिक नितीन सावंत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List