सोसायटीतील अतिक्रमणाबाबत सभासदही करू शकतो तक्रार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
>> मंगेश मोरे
हाऊसिंग सोसायटीमध्ये कुणी अतिक्रमण केले असेल तर त्याविरोधात सोसायटीतील दुसरा सभासद व्यक्तिशः तक्रार करू शकतो. अतिक्रमणाविरोधात सभासदाने सोसायटीमार्फतच तक्रार करणे बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. अतिक्रमणामुळे दुसऱया सभासदाच्या हक्कांवर गदा येत असेल तर त्या सभासदाला तक्रार करण्याचा हक्कच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
विलेपार्ले पूर्वेकडील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय चव्हाण यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. सोसायटीच्या आवारात केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली. त्या नोटिसीला आव्हान देण्यात आले. पालिकेची नोटीस बेकायदेशीर असून पालिकेने आपल्या अधिकाराचा अनियंत्रित वापर केल्याचे म्हणणे फिर्यादीने सूटद्वारे मांडले. तो सूट प्रलंबित असताना याचिकाकर्ते दत्तात्रय चव्हाण यांनी दिंडोशी दिवाणी न्यायालयात ‘चेंबर समन्स’ दाखल केले होते. तथापि, दिवाणी न्यायालयाने ते समन्स फेटाळल्याने चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन रिट याचिका दाखल केली. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती मोडक यांनी दिवाणी न्यायालयाचा आदेश रद्द केला.
नेमके प्रकरण काय?
नील गांगण को. ऑप. हाऊसिंग सोसायटीशी संबंधित हे प्रकरण आहे. सूट दाखल करणारे फिर्यादी जी. जयकुमार यांचे दोन फ्लॅट्स आणि याचिकाकर्ते चव्हाण यांच्या मालकीचा एक फ्लॅट आहे. जयकुमार यांचे फ्लॅट्स तळमजल्याला असून चव्हाण यांचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर आहे. जयकुमार यांनी परवानगी न घेताच दोन फ्लॅट्स एकत्र केले. तसेच फ्लॅट्सच्या बाहेरील कॉमन जागेत ओटय़ाचे बांधकाम केले आणि सोसायटीच्या कार्यालयात अतिक्रमण केले. याविरोधात कारवाई करण्यासाठी चव्हाण यांनी पालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या. याच वादादरम्यान एका सभासदाच्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध दुसरा सभासद न्यायालयात व्यक्तिशः तक्रार करू शकतो का? असा मुद्दा उपस्थित झाला होता.
कोर्टाची निरीक्षणे
– एकीकडे घरमालक आणि भाडेकरू, तर दुसरीकडे सोसायटी आणि सोसायटी सभासद यांच्यातील संबंध वेगळय़ा पायावर आधारलेले आहेत.
– महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, 1960 मधील तरतुदींचा विचार करता सोसायटी ही संपूर्ण इमारत आणि जमिनीची मालक असते तर सोसायटीचा सभासद असलेल्या व्यक्तीला त्याच्या मालकीचा फ्लॅट व दुकान ताब्यात ठेवण्याचा हक्क आहे.
– अनधिकृत बांधकामाविरोधात सोसायटी पुढे आली नाही तरी दुसरा सभासद व्यक्तिशः न्यायालयात तक्रार करू शकतो. त्याने सोसायटीमार्फतच तक्रार केली पाहिजे, असे बंधनकारक नाही.
– जर एका सभासदाने कॉमन जागेत ओटय़ाचे बांधकाम वा सोसायटी कार्यालयाच्या आवारात अतिक्रमण केले असेल तर दुसऱया सभासदाला सोसायटीतील त्याच्या हक्कांवर गदा येत असल्याने तक्रार करण्याचा हक्क आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List