मराठा मुख्यमंत्र्याच्या चर्चेमुळे संघ नाराज? माध्यमांमध्ये चर्चांना उधाण
मुख्यमंत्रिपदासाठी मराठा व्यक्तीचे नाव चर्चेत आल्याने संघात नाराजी पसरली आहे. इतकंच नाही तर जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले नाही तर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला फटका बसेल असेही संघाने म्हटले आहे.
हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा व्यक्ती बसेल अशी अफवा पसरली होती. पण या अफवेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नाराजी पसरली आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे संघाला वाटत होते. पण गेल्या काही दिवसात भाजप मराठा मुख्यमंत्री करतील अशी चर्चा होती, त्यामुळे संघात अस्वस्थता होती.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नावं चर्चेत होती. तावडे, पाटील आणि मोहोळ हे मराठा आहेत तर बावनकुळे हे ओबीसी आहेत. भाजपच्या विजयात मराठा आणि ओबीसी समाजाचा मोठा वाटा आहे असं सागितलं जात होतं. त्यामुळे जातीय समीकरण राखण्यासाठी भाजप मराठा किंवा ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री देतील अशी शक्यता होती.
आणि याच चर्चेमुळे संघात नाराजी पसरली होती. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि त्यांच्यासाठी संघाने जोरदार प्रचारही केला होता. फडणवीस आणि संघाच्या तीन हजार स्वयसंकेवकांनी जिल्हा जिल्ह्यात जाऊन प्रचार केला आणि महायुतीच्या विजयासाठी हातभार लावला. नाव न सांगण्याच्या अटीवर संघाच्या नेत्याने सांगितले की संघाने भाजपला सांगितले आहे की मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस हे नैसर्गिक निवड आहे. जर फडणवीस यांना मुख्यमंत्री नाही केले तर आगामी काळात महानगरपालिका निवडणुकीत विशेषतः मुंबईत पक्षाला फटका बसेल.
भाजपमधून मुख्यमंत्रिपदासाठी ज्या चार नावांची चर्चा होत होती त्यावरून संघात नाराजी होती. हे चारही नेते संघाच्या मुशीतच वाढले असले तरी संघाची विचारसरणी आणि कार्य पुढे नेताना ते कमी पडत असल्याचे संघाने म्हटले आहे. भाजपने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलेली आहे. त्यामुळे भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी मराठा चेहरा देण्याचा आग्रह धरू नये असेही संघाने म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

Comment List