पहिल्या दिवशी नोकरी; दुसऱ्या दिवशी घर साफ, चोरी करून पसार होणारी सराईत मोलकरीण गजाआड
चांगल्या घरी मोलकरणीचे काम बघायचे. काम मिळाल्यानंतर पहिल्या दिवशी व्यवस्थित काम करायचे. दुसऱ्या दिवशी किंमती ऐवज घेऊन पसार होणारी सराईत चोर मोलकरीण गुन्हे शाखा युनिट-7 च्या हाती लागली आहे. तिला वाशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मोलकरणीचे काम मिळाल्यानंतर एक -दोन दिवस काम करून मग घर साफ करून पसार होणारी महिला मोलकरीण माहुल परिसरात लपून राहत असून तिचा विविध पोलीस ठाण्याचे पथक शोध घेत असल्याची माहिती युनीट-7 चे अंमलदार अजय बल्लाळ यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक काळे व परबळकर तसेच पवार, अजय बल्लाळ, महिला अंमलदार तिरोडकर या पथकाने माहुल गाव येथील म्हाडा कॉलनी गाठून तेथे राहणाऱ्या वनिता उर्फ आशा गायकवाड (38) हिला पकडले. चौकशीत तिने वाशी येथे एका घरातून तीन लाख 49 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केल्याचे सांगितले. त्याप्रकरणात वाशी पोलीस तिचा शोध घेत असल्याचे कळताच युनीट-7 ने वनिताला पुढील कारवाईसाठी वाशी पोलिसांकडे सुपूर्द केले. वनिताविरोधात मुंबईतील जुहू – 12, खार – 9, बांद्रा – 5, सांताकृझ – 4, वर्सेवा – 3, अंबोली – 2, मरीन ड्राईव्ह – 1, ओशिवरा – 2, ताडदेव – 2, ट्रॉम्बे – 1, भायखळा -1, चेंबूर – 1, डीएनए नगर – 1 अशा पोलीस ठाण्यात मिळून 44 गुह्यांची नोंद आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List