दूध का दूध पाणी का पाणी! EVM ची पोलखोल करण्यासाठी बॅलेट पेपरवर घेणार मतदान, मारकडवाडी ग्रामस्थांचा निर्णय

दूध का दूध पाणी का पाणी! EVM ची पोलखोल करण्यासाठी बॅलेट पेपरवर घेणार मतदान, मारकडवाडी ग्रामस्थांचा निर्णय

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर EVM मध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप अनेक उमेदवारांनी केला. त्यामुळे राज्यात सध्या EVM विरुद्ध बॅलेट पेपर असा वॉर रंगताना दिसत आहे. या सर्व घडामोडींमध्ये माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी EVM मशीनच्या विरोधात हत्यार उचललं असून इव्हीएमची पोलखोल करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव केला आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत EVM मशीनच्या मतदानावर आक्षेप घेत मतदान बॅलेट पेपरच्या माध्यामातून पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

विधानसभा निवडणुकीत माळशिरस मधून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर हे तेरा हजारच्या मताधिक्यांनी विजयी झाले. जानकर यांनी भाजपचे उमेदवार राम सातपूते यांचा पराभव केला. मात्र, जानकर यांचा अल्पमतातील हा विजय मारकडवाडी ग्रामस्थांना मान्य नाही. एक लाखांपेक्षा अधिक मतांनी जानकर निवडून येणे ग्रामस्थांना अपेक्षित होते. जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे EVM चे कटकारस्थान असल्याचा त्यांना संशय असून मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80 टक्के मतदान झालेले असताना EVM ची आकडेवारी वेगळीच येत असल्याने गावकऱ्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे EVM मशीनची पोलखोल करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. झालेल्या निवडणुकीत राम सातपुते यांना 843 मते तर जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत. या मतदान संख्येवर गावकऱ्यांना साशंकता वाटत आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये गावकऱ्यांनी जानकर यांना अधिकचे मताधिक्य दिले आहे. यावेळी तर गावात एकतर्फी वातावरण होते. त्यामुळे सातपुते यांना फारतर शे दीडशे मते पडायला पाहिजे होती. मात्र, त्यांना 843 मते मिळाल्याने ग्रामस्थांना EVM बाबत शंका वाटू लागली आहे.

मतदानाची शहानिशा करण्यासाठी जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकिय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिले आहे. दिनांक 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे. त्याचा सर्व खर्च गावकरी करणार आहेत. या बॅलेट वरील मतदानासाठी गावात फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया घेतली जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यास दिल्या असून गावातील प्रत्येकाने आपण या निवडणुकीत ज्याला मतदान केले त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. वास्तविक या निवडणुकीत मोहिते पाटील व उत्तम जानकर हे दोन राजकीय कट्टर विरोधक एकत्र आल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्याची अपेक्षा होती. मात्र, निवडणूक निकाल येताच जानकर हे केवळ 13 हजार मताच्या फरकाने शेवटच्या टप्प्यात विजयी झाल्याने जानकर समर्थकांना EVM मशीनवर विश्वास नसल्याची भावना तयार झाली आहे. यातच राज्यातील बहुतांश नेते EVM मशीनवर शंका उपस्थित करू लागल्याने मारकडवाडी हे राज्यातील पहिले गाव असून ज्या गावाने थेट बॅलेटवर मतदान घेऊन दूध का दूध पाणी का पाणी करण्याचे साहसी पाऊल उचलले आहे. त्यामुळे मतदान बॅलेट पेपरच्या माध्यामातून पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे अशी विनंती मारकरवाडीचे सरपंच वी जी मारकड यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;