मिंधे आता मोदी-शहांचे ‘लाडके भाऊ’ राहिलेले नाहीत, त्यांच्या चेहऱ्याचं हास्य मावळलंय! – संजय राऊत
महाराष्ट्राचा निकाल लागून 9 दिवस झाले तरीही मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त माध्यमं देत आहेत, मात्र निर्णयाचा सूर्य उजाडलेला नाही. फडणवीस 5 डिसेंबरला शपथ घेणार अशीही चर्चा आहे. मात्र हा महिना अद्याप संपलेला नसून तोपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा भरवसा नाही. ते आता मोदी-शहांचे लाडके भाऊही राहिलेले नसून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले आहे, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना लगावला.
शिंदे आपल्या मूळगावी गेले असून ते मनाने खचलेले आहेत. अस्वस्थ आहेत. त्यांचे मानसिक, शारीरिक स्वास्थ बिघडलेले आहे. याला जबाबदार कोण? त्यांची प्रकृती का बिघडली? त्यांना कुणी शब्द देऊन फिरवला का? असे अनेक गंमतीशीर विषय चर्चेत आहेत. शिदेंचा चेहरा पडलेला असून ते हसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळलेले आहे. डोळ्यात चमक दिसत नाही. मी लाडका भाऊ… मी लाडका भाऊ… एवढेच ते बडबडताहेत. पण ते आता मोदी-शहांचे लाडके भाऊ राहिलेले नाहीत. ते फडणवीस यांचेही लाडके भाऊ दिसत नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
मी लाडका भाऊ… मी लाडका भाऊ… एवढेच शिंदे बडबडत असून त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांच्या सहकऱ्यांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले पाहिजे. कारण भाजप विषवल्ली असून जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंख मारतात. आम्हालाही डंख मारला. महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे. तो लोकशाही मार्गाने कसा सोडवायचा ते आम्ही पाहू, असेही राऊत यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाच्या बदल्या शिंदे गृहमंत्रीपद मागत असल्याची चर्चा आहे. फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद होते, तसेच त्यांना हवे आहे. मात्र तेव्हा फडणवीस यांच्याकडे 100 च्या वर आमदार होते. एवढे आमदार असतानाही शिदेंनी शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी खातर त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. तेव्हाच शिदेंनी गृहखाते घ्यायला हवे होते. पण मेहरबानी म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. अन्यथा 105 आमदार असलेला पक्ष मुख्यमंत्रीपद सोडतो का? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच मोठा निर्णय घ्यायला हिंमत लागते. ईडी, सीबाआयचे भय ज्यांच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी घट्ट
महाविकास आघाडीत कुणीही स्वबळाची भाषा करत नाही. महाविकास आघाडी घट्ट आहे. लोकसभेवेळी आम्ही जिंकलो तेव्हा हे प्रश्न कुणी उपस्थित केले नाहीत. विधानसभा निकाल हे कोणत्या पद्धतीने लागले त्यामागील तांत्रिक गोष्टींचा अभ्यास आम्ही करत आहोत. तसेच विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात फरक आहे, त्यावेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही राऊत यावेळी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List