ईव्हीएमविरोधात देशभर ‘आघाडी’, मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याची मागणी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ईव्हीएमचा गैरवापर केला गेल्याचे पुरावे हळूहळू समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये भाजपबद्दल प्रचंड असंतोष असतानाही त्यांच्या इतक्या जागा निवडून कशा आल्या, नक्कीच काहीतरी गडबड आहे अशी चर्चा केवळ राजकीय पक्षांमध्येच नाही तर ज्यांनी प्रत्यक्ष मतदान केले त्या सर्वसामान्य मतदारांमध्येही आहे. याविरोधात उमेदवारांनी न्यायालयात जायला हवे असे मतदारसंघातील लोक बोलू लागले आहेत. दुसरीकडे आता ईव्हीएम नकोच, मतपत्रिकांवर निवडणुका घ्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भाजपविरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ईव्हीएमविरोधात रान उठवले आहे तर ‘इंडिया’ आघाडीने या मागणीसाठी देशव्यापी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची मते जाणून घेऊन ईव्हीएमविरुद्ध एल्गार पुकारण्याचे ठरवले आहे.
मतपत्रिकांवर निवडणुका घ्या
दिल्लीच्या तालकोटरा स्टेडियमवर काँग्रेसच्या वतीने संविधान दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही त्यात याचे सूतोवाच केले. मतदानासाठी ईव्हीएमऐवजी पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांचा वापर सुरू करण्यात यावा, आम्हाला ईव्हीएम नको मतपत्रिका हव्यात असे खरगे म्हणाले. या मागणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर देशव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही खरगे यांनी दिला. निवडणुकीमध्ये ओबीसी, एससी, एसटी आणि समाजातील अन्य मागास घटक पूर्ण शक्ती लावून मतदान करतात. परंतु ईव्हीएम घोटाळ्यामुळे ते वाया जात आहे, असे खरगे म्हणाले. भाजपला ईव्हीएम मशिन्स हव्या असतील तर त्यांनी त्या त्यांच्या घरी ठेवाव्यात, असा टोलाही त्यांनी लगावला.
आता हटायचे नाही, लढायचे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत आमदारांचीही आज मुंबईत बैठक झाली. ईव्हीएमची आकडेवारी आणि टक्केवारीबरोबरच विधानसभेच्या एकूण निकालावर आमदारांनी या वेळी संशय व्यक्त केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर ईव्हीएमविरोधात ठोस भूमिका घेण्याचे ठरवले आहे. ईव्हीएमविरोधात देशात मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असे मत शरद पवार यांनी मांडले आहे. उमेदवारांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात कायदेशीर लढाई लढण्यासाठी राज्य आणि पेंद्रीय पातळीवर वकिलांची टीम तयार करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतल्याचे समजते. उमेदवारांना 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी मुदत आहे. त्यामुळे सर्वच पराभूत उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी अशा सूचना त्यासंदर्भातील पत्राचा एक नमुनादेखील शेअर करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List