‘घड्याळ’ चिन्हाचा वाद, अजितदादांनी मतदारांना कन्फ्यूज केले
अजित पवार गटाने ‘घडय़ाळ’ चिन्हाबाबत मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करून त्याचा फायदा घेतला, असा दावा करणारे शपथपत्र शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केले.
निवडणूक प्रचारादरम्यान ‘घडय़ाळ चिन्ह न्यायप्रविष्ट आहे’ असा स्पष्ट उल्लेख करावा, असे न्यायालयाने अजित पवार गटाला बजावले होते. शरद पवार यांचे नाव व पह्टो वापरण्यासही प्रतिबंध आहे, असेही न्यायालयाने नमूद केले होते. न्यायालयाच्या या आदेशाचे पालन अजित पवार गटाने केले नाही. अजित पवार गटाच्या प्रचारात, जाहिरातीत कशा प्रकारे आदेशाचे उल्लंघन झाले त्याचे पुरावे सादर करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती शरद पवार गटाकडून शपथपत्रात करण्यात आली आहे.
काय आहे वाद
शरद पवारांची साथ सोडून अजित पवार महायुतीत सामील झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला दिले. याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हा वाद प्रलंबित असताना घडय़ाळ चिन्ह वापरण्याची मुभा न्यायालयाने अजित पवार गटाला दिली. याला शरद पवार गटाने विरोध केला. ‘घडय़ाळ चिन्ह न्यायप्रविष्ट आहे’ असे स्पष्ट शब्दात लिहा, असे आदेश न्यायालयाने दिले. अजित पवार गटाने या आदेशाचे उल्लंघन केले, असा दावा करणारे नवीन शपथपत्र शरद पवार गटाने दाखल केले आहे.
चिन्ह वापरू देऊ नका
घडय़ाळ चिन्हाचा अंतिम निकाल लागेपर्यंत हे चिन्ह वापरण्यास अजित पवार गटाला मनाई करावी, अशी मागणीही शपथपत्रात करण्यात आली आहे. या चिन्हाचे पुरावे असलेली सहा कागदपत्रे सादर करण्यास शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाने न्यायालयाची परवानगी मागितली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List