‘पुष्पा 2’मधील आयटम साँगवर समंथाची थेट प्रतिक्रिया; अल्लू अर्जुनसोबत श्रीलीलाला नाचताना पाहून म्हणाली..
येत्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाची प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या टीमकडून त्याचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. नुकताच त्यातील ‘किसिक’ हा आयटम साँग लाँच करण्यात आला. ‘पुष्पा 1: द राइज’मध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा आयटम साँग पहायला मिळाला होता. ‘ऊ अंटावा’ या गाण्याची भुरळ आजही तितकीच आहे. मात्र आता दुसऱ्या भागात समंथाची जागा अभिनेत्री श्रीलीलाने घेतली आहे. ‘किसिक’ या गाण्यात श्रीलीला आणि अल्लू अर्जुन एकत्र थिरकले आहेत.
या गाण्याने 24 तासांत युट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या गाण्याच्या तेलुगू लिरिकल व्हर्जनला 18 तासांत 25 दशलक्षांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘पुष्पा 1’मध्ये समंथाने तिच्या करिअरमधील पहिला आयटम साँग केला होता. तो तुफान हिट झाला. त्यामुळे ‘पुष्पा 2’मधील आयटम साँग प्रदर्शित झाल्यावर त्याची पहिल्या गाण्याची तुलना होणं स्वाभाविक आहे. ‘किसिक’ हे गाणं प्रदर्शित होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. ‘मान्य करा अथवा नको, पण किसिक हे गाणं पुष्पासाठी नकारात्मक ठरेल’, असं एकाने लिहिलं होतं. तर ‘समंथाचा ‘ऊ अंटावा’ या गाण्यापेक्षा 1000 पटींनी भारी होता’, असं दुसऱ्याने म्हटलं होतं. ‘या गाण्यात ऊ अंटावासारखी खास गोष्ट नाही’, असंही मत नेटकऱ्यांनी नोंदवलं होतं. आता या गाण्यावर समंथाने प्रतिक्रिया दिली आहे.

समंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या गाण्याला रिपोस्ट केलंय. त्यात श्रीलीलाला टॅग करत तिने लिहिलं, ‘Killed It.’ समंथाच्या या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होतंय की तिला श्रीलालाचा डान्स आणि गाणं खूपच आवडलंय. यासोबतच तिने पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, ‘शांतता राखा आणि पुष्पा 2 ची प्रतीक्षा करा.’ पुष्पाच्या सीक्वेलची केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात क्रेझ आहे. अमेरिकेत हा चित्रपट प्री-सेल्समध्येही बरेच विक्रम रचतोय. प्री-सेल्समध्येच सर्वांत जलद गतीने दोन दशलक्ष डॉलरची बुकिंग मिळवणारा हा चित्रपट ठरला आहे.
‘पुष्पा 2’मधील या गाण्यासाठी पुन्हा एकदा समंथाला विचारण्यात आलं होतं. मात्र आजारपणामुळे तिने या गाण्याला नकार दिला होता. त्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरला ऑफर देण्यात आली होती. पण श्रद्धाने मानधन अव्वाच्या सव्वा मागितल्याने अखेर श्रीलीलाची या गाण्यासाठी निवड झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List