भडका… तिसरे महायुद्ध उंबरठय़ापर्यंत! रशियाने युक्रेनवर डागली अत्याधुनिक हायपरसॉनिक मिसाईल
रशिया आणि युक्रेनमध्ये दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे आता तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. रशियाने 21 नोव्हेंबर 2024 रोजी युक्रेनियन शहर डनिप्रोवर आपले नवीन हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘ओराश्निक’ (हेझेल ट्री) सोडले. या हल्ल्याकडे केवळ रशियाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन नव्हे, तर पाश्चात्य देशांना कडक इशारा म्हणूनही पाहिले जात आहे. युक्रेनियन लष्कराच्या म्हणण्यानुसार, डनिप्रो शहरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र, सात क्रूझ क्षेपणास्त्रेही डागण्यात आली. रशिया-युक्रेनमधील अलीकडच्या काळात तणाव वाढत चालला आहे. युक्रेनच्या हवाई दलाचे म्हणणे आहे की, रशियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागली आहेत. रशियाचे नवीन हायपरसॉनिक ‘ओराश्निक’ क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा कितीतरी पट अधिक वेगाने लक्ष्यावर हल्ला करते. त्याचा वेग ताशी 13 हजार किमीपर्यंत असू शकतो.
रशियाकडे कमीत कमी दहा क्षेपणास्त्रे
युक्रेनच्या म्हणण्यानुसार, रशियाकडे आणखी कमीत कमी दहा क्षेपणास्त्रे असू शकतात. अमेरिकेच्या अधिकारी आणि नाटो यांनी याला मध्यम पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाईल असे म्हटले आहे. गुरुवारी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी मध्यम पल्ल्याच्या हायपरसॉनिक बॅलेस्टिक मिसाईल असल्याचे म्हटले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या क्षेपणास्त्राच्या अणुशक्तीचे संकेत देत या क्षेपणास्त्राचे प्रभावी अस्त्र असल्याचे सांगितले आहे. हे क्षेपणास्त्र रशियाच्या यशस्वी लष्करी आणि तांत्रिक प्रयत्नांचा पुरावा आहे, ज्याचा वापर पाश्चिमात्य देशांविरुद्ध केला जाऊ शकतो.
युक्रेनची लष्करी औद्योगिक संरचना नष्ट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा दावा रशियन अधिकाऱ्यांनी केला आहे. युक्रेनच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत, या हल्ल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे वर्णन ‘गंभीर’ आणि आंतरराष्ट्रीय शांततेला धोका असल्याचे म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List