पहिल्याच प्रयत्नात षटकार ठोकणार की झुंज देणार; रोहित पाटील, सुहास बाबर, वैभव पाटील, संग्रामसिंह देशमुख, जयश्री पाटील यांच्या लढतीकडे लक्ष

पहिल्याच प्रयत्नात षटकार ठोकणार की झुंज देणार; रोहित पाटील, सुहास बाबर, वैभव पाटील, संग्रामसिंह देशमुख, जयश्री पाटील यांच्या लढतीकडे लक्ष

क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणे सहज शक्य नसते. त्यासाठी ‘सेट’ व्हावे लागते. मात्र, राजकारणात तसे काही नसते. पहिल्याच प्रयत्नात विजयी षटकार ठोकण्याची संधी चालून येऊ शकते. यंदा सांगली जिह्यातील विधानसभा निवडणुकीत युवा नेते रोहित पाटील, सुहास बाबर, वैभव पाटील, संग्रामसिंह देशमुख, जयश्री पाटील यांची पहिली लढत उत्कंठावर्धक आणि चर्चेची ठरू शकते. पहिल्याच प्रयत्नात ते षटकार ठोकणार, की झुंज देणार हे प्रचाराची रणनीती, पाठीराख्यांची ताकद, लढतीपूर्वीचा सराव आदींवर अवलंबून असणार आहे.

पूर्वीचा तासगाव मतदारसंघ आणि आताचा तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ येथील लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यानंतर त्यांची पत्नी सुमनताई पाटील यांनी हा गड राखला. आता नवे शिलेदार म्हणून त्यांचे सुपुत्र रोहित पाटील मैदानात उतरले आहेत. त्यांची पहिली लढत तीदेखील विधानसभेची आहे. त्यांच्या वडिलांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी, माजी खासदार संजय पाटील यांच्याशी होत आहे. राज्याचे युवा नेते म्हणून रोहित पाटील सर्वत्र चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना अपेक्षेप्रमाणे मिंधे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात महाआघाडीने राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वैभव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दोघेही विधानसभेच्या मैदानात प्रथमच लढत आहेत. दोन्ही कुटुंबांची पारंपरिक लढाई यापूर्वी लक्षवेधी ठरली आहे. आता दोन्ही कुटुंबांचे वारस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पहिल्याच प्रयत्नात विजयाचा षटकार ठोकण्यासाठी ते सज्ज आहेत. अर्थात त्यांची लढाई सोपी नसून, त्यांना फार सराव करावा लागणार आहे.

पलूस-कडेगाव मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मागील निवडणुकीत त्यांना तिकीट मिळाले नाही. यंदा कोणत्याही परिस्थितीत लढायचे, असा निर्धार करून ते सज्ज आहेत. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम मैदानात उतरले आहेत.

सांगली विधानसभेच्या मैदानात जयश्री पाटील या प्रथमच उतरल्या आहेत. तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्यामागे मदनभाऊंचे समर्थक आहेत. प्रमुख लढतीमध्ये असलेल्या रोहित पाटील, सुहास बाबर, वैभव पाटील, संग्रामसिंह देशमुख, जयश्री पाटील हे प्रथमच विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत.

काहीजण पुन्हा नशीब आजमावणार

विधानसभेच्या मैदानात सलग दुसऱ्यांदा, हॅट्ट्रिक किंवा जास्त वेळा निवडून येण्यासाठी काही उमेदवार रिंगणात आहेत. काहींचा पराभव झाल्यानंतर ते पुन्हा मैदानात उतरले आहेत. पराभवाचा वचपा काढण्याची काहींना प्रतीक्षा असणार आहे. त्याचबरोबर पाडापाडीच्या राजकारणासाठीही काहीजण सज्ज आहेत. त्यामुळे कोणाचे नशीब साथ देणार याचीही उत्सुकता लागली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;