विक्रमगडमध्ये भाजपविरोधात मिंधे गटाचे बंडाचे निशाण; शिंदेंनी कारवाई केली तरी बेहत्तर.. निवडणूक लढणारच !
मिंध्यांची उघडपणे मुस्कटदाबी करत भाजपने विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हायजॅक केला. तेथून भाजपने हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे तिळपापड झालेल्या मिंधे गटाने बंडाचे निशाण फडकावले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कारवाई केली तरी बेहत्तर.. निवडणूक लढणारच, असा इशारा मिंध्यांचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिला आहे. त्यामुळे विक्रमगडमध्ये महायुतीत जागेवरून अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्या आहेत.
महायुतीत भाजपकडे विक्रमगडची जागा गेल्याने मिंर्धेच्या इच्छुकांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. इच्छुक उमेदवार प्रकाश निकम यांनी तातडीने, मोखाड्यात कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यांच्या समर्थकांची व कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आता माघार नाही आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता यावेळी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच समर्थकांचा जोष बघून निकम यांनी पक्षाने कारवाई केली तरी बेहत्तर आता माघार नाही, असे म्हणत मिंध्यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे महायुतीत बंडाची ठिणगी पडली आहे.
भाजपला धडा शिकवण्याचा इशारा
विक्रमगड विधानसभा संघटक प्रदीप वाघ, सहसंघटक चंद्रकांत रंधा, मोखाडा तालुकाप्रमुख अमोल पाटील, विक्रमगड तालुकाप्रमुख सागर आळशी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत भाजपला घडा शिकवण्याचा इशारा दिला. तसेच या सर्वांनी पक्षाने कारवाई केली तर सामूहिक राजीनामा देऊ आणि निवडणूक लढवू, असे आव्हानच शिंदेंना दिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List