सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात परिवर्तन होणार; अंबादास दानवे यांचा विश्वास
मागील तीन विधानसभा निवडणुकीत मत विभाजनामुळे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार विजयी झाले. मात्र या निवडणुकीत मतदारसंघात परिवर्तन होणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ आयोजित पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना व्यक्त केला.
तालुक्यातील भवन, पालोद, अंधारी व भराडी जिल्हा परिषद गटांतील कार्यकर्त्यांचा रविवार, २७ रोजी पदाधिकारी मेळावा झाला. महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने ध्येय आणि उद्दिष्ट ठरवून मतदान करवून घ्या. मागील विधानसभा निवडणुकीत मत विभाजनाची झालेली चूक पुन्हा होता काम नये, अशी सूचना करून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना जोमाने प्रचार करण्यास सुरुवात करण्याचे आदेश दानवे यांनी दिले.
देशाच्या सीमेवर भारत मातेचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांची जमीन हडपण्याचे महापाप अब्दुल सत्तार यांनी केले आहे. जवानांच्या जमिनीसुद्धा या गद्दार आमदाराने सोडल्या नसून बळीराजाचीही जमीन नगरपालिका हद्द वाढ व एमआयडीसी निर्माणाच्या नावाखाली बळकावली आहे. वीर जवान आणि किसानबांधवांचा अपमान करणाऱ्या या भ्रष्ट लोकप्रतिनिधीला या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवायचा असल्याने आतापासूनच जोमाने कामाला लागा, असे आवाहन अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना केले.
शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुरेश बनकर हे सर्वसामान्य माणसातला सच्चा कार्यकर्ता आहेत. भूमिपुत्रांच्या समस्यांची जाण आणि ज्ञान असणारा उमेदवार महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी दिला आहे. सर्वसामान्य माणसातला प्रामाणिक कार्यकर्ता दिला असल्याने त्यांचा प्रचार समर्पण भावनेने करण्याचे आवाहन दानवे यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवारी देऊन जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे. तो पूर्णपणे सार्थ करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करील. मतदारसंघात सुरू झालेली दडपशाही मिटवेल, अशी ग्वाही सुरेश बनकर यांनी दिली. यावेळी जिल्हा समन्वयक रघुनाथ चव्हाण, उपजिल्हाप्रमख विठ्ठल बदर पाटील, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, तुकाराम कळम, संजय कळात्रे,भवन, पालोद, अंधारी व भराडी जि.प. गटांतील कार्यकर्त्यांचा मेळावा मच्छिंद्र घाडगे, पद्माकर इंगळे, उत्तम शिंदे, कैलास जंजाळ, आबासाहेब जंजाळ, दिलीप गवळी, रामराव हिवाळे, कृष्णा बावसकर, विष्णू काटकर, ज्ञानेश्वर तायडे, नारायण खोमणे, राजेंद्र जैस्वाल, शिवा गौर, साहेबराव भांबर्डे, शंकर माने, भास्कर आहेर, देविदास पंडित, रघुनाथ पांडव, गजानन घोंगटे, अमोल शेळके व शिवाजी शेळके उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List